यवतमाळमधून कोण बाजी मारणार?
![]() |
यवतमाळमधून कोण बाजी मारणार? |
विधान परिषदेच्या यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आज, शुक्रवारी होणाऱ्या पोटनिवडणुकीत घोडेबाजाराने उच्चांक गाठल्याची चर्चा आहे. मतदारांना लक्ष्मीदर्शन घडविण्यात आल्याची चर्चा रंगली आहे. मतांची फाटाफूट होऊ नये म्हणून मतदारांनाही भारतदर्शनही घडविण्यात आल्याचे सांगण्यात येते.
यवतमाळमध्ये बाहेरचा उमेदवार देण्याची परंपरा शिवसेनेने कायम ठेवली आहे. २०१० आणि त्यानंतर २०१६ मध्ये झालेल्या विधान परिषद निवडणुकीपासून स्थानिक स्वराज्य संस्थेत घोडेबाजार तेजीत आला. तोच कित्ता या वेळी गिरविण्यात येत आहे. मतदारांना रोख बक्षीस देण्याबरोबरच आणि त्यांच्या पर्यटनावर खर्च केला गेल्याची चर्चा आहे.निवडणूक रिंगणात असलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस -काँग्रेस महाविकास आघाडी आणि भाजप या दोन्ही मुख्य पक्षांचे मतदार गेल्या १० दिवसांपासून भारतात विविध ठिकाणी पर्यटन करत आहेत. त्यापैकी महाविकास आघाडीसह इतर आणि अपक्ष असे ३१७ मतदार आग्रा, वाघा बॉर्डर, बंगळुरू, उटी, हैदराबाद, पेंच आदी ठिकाणी पर्यटन करून हवाईमार्गे गुरुवारी सकाळी नागपुरात परतले. नागपूर येथील एका रिसॉर्टमध्ये महाविकास आघाडीच्या वतीने आयोजित ‘कॅम्प’साठी हे सर्व जण उपस्थित असल्याची माहिती सूत्रांनी दिली. भाजपने हैदराबाद येथे पर्यटनास पाठविलेल्या मतदारांना दोनच दिवसांत परत बोलाविल्याने काही मतदारांनी नाराजी व्यक्त केल्याचे सांगण्यात येते. बाहेरचा उमेदवार नको, या मुद्दय़ावर स्थानिक अपक्ष उमेदवाराचा आक्षेप महाराष्ट्र विकास आघाडीने मोडीत काढला. या ‘उलाढाली’त अपक्षांनी सपशेल माघार घेतल्याचे चित्र आहे.
Post a Comment