भाजपच्या जागा दुप्पट, सत्ता मात्र महाविकास आघाडीकडे; गडकरी, फडणवीसांना नागपुरात जनतेने दाखवला 'हात', काँग्रेसला सत्ता



मुंबई : राज्यातील ६ जिल्हा परिषदांच्या निवडणुकांत एकूण ३३२ जागांपैकी भाजपला एकूण १०३ जागा मिळाल्या. गतवेळी या जिल्हा परिषदांत भाजपकडे ५३ जागा होत्या. यंदा त्या दुपटीने वाढल्या आहेत. मात्र विधानसभा निवडणुकीप्रमाणेच जिल्हा परिषदेतही भाजपला एक अपवाद वगळता सत्ता मिळवता आली नाही. काँग्रेसला ७०, राष्ट्रवादी काँग्रेस ४६ व शिवसेनेला ४९ जागा मिळाल्या. नागपूर, नंदुरबार, पालघर, वाशीममध्ये महाविकास आघाडीने सत्ता काबीज केली. धुळ्यात भाजपने एकहाती सत्ता मिळवली, तर अकोल्यात वंचित बहुजन आघाडीने सत्ता राखली अाहे.
महाविकास आघाडी सत्तेवर आल्यानंतर राज्यातील जिल्हा परिषदांची ही पहिलीच सार्वत्रिक निवडणूक होती. यात सर्वाधिक लक्ष नागपुरातील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीकडे होते. जिल्हा परिषद हातातून जाऊ नये यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. या दोन्ही नेत्यांसह माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हा पिंजून काढला, मात्र तिघांचेही प्रयत्न भाजपची पीछेहाट थांबवू शकले नाही.
दरम्यान, पंचायत समित्यांच्या निवडणुकीत एकूण ६६४ जागांपैकी भाजपला सर्वाधिक १९४, काँग्रेस १४५, शिवसेना ११७ व राष्ट्रवादीला ८० जागा मिळाल्या आहेत.
खान्देशात धुळ्यात मात्र भाजपने ५६ पैकी एकूण ३९ जागा मिळवून काँग्रेसचा धुव्वा उडवला आहे. गतवेळी ३० जागांसह सत्तेत असलेल्या काँग्रेसला यंदा फक्त ७ जागांवर समाधान मानावे लागले आहे.
नंदुरबारमध्ये काँग्रेस-भाजपला समान म्हणजे २३ जागा मिळाल्या, परंतु शिवसेनेने प्रथमच ७ जागा जिंकल्याने काँग्रेस-शिवसेना सत्तेवर येण्याची चिन्हे आहेत. पालघरमध्ये शिवसेनेने १८ जागा जिंकल्या अाहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि अपक्षांच्या साथीने महाविकास आघाडी सत्ता काबीज करेल.

No comments

Powered by Blogger.