वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात 'सरप्राइज पॅकेज' खेळाडू, विराटने सांगितलं नाव

इंदौर, 08 जानेवारी : भारताने लंकेविरुद्धचा दुसऱा टी20 सामना 7 गडी राखून जिंकला. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. गुवाहाटीतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला. तिसरा आणि शेवटचा सामना पुण्यात होणार आहे. दरम्यान, दुसऱ्या सामन्यातील विजयानंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीने गोलंदाजांचे कौतुक केलं.
जसप्रीत बुमराह तंदुरुस्त झाला आहे. शार्दुल ठाकुर, नवदीप सैनी या नवख्या खेळाडूंनीही चमकदार कामगिरी केली. सौनीने दोन आणि ठाकुरने तीन गडी बाद केले. याबद्दल बोलताना विराट म्हणाला की, 'यंदा ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपमध्ये असे गोलंदाज असणं चांगली गोष्ट आहे.' विराटने याचवेळी कर्नाटकचा युवा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाचेही कौतुक केले. तो म्हणाला की, ऑस्ट्रेलियात खेळपट्ट्या उसळी घेणाऱ्या असतात. अशा ठिकाणी कृष्णासारखे गोलंदाज संघात असणं फायदाचं ठरू शकतं. मला वाटतं तो सरप्राइज पॅकेज होऊ शकतो. प्रसिद्ध कृष्णा असा गोलंदाज आहे ज्याने घरेलू क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे.
प्रसिद्ध कृष्णाने 41 लिस्ट ए क्रिकेटमध्ये 67 विकेट घेतल्या आहेत. तर 6 प्रथम श्रेणी सामन्यात 20 गडी बाद केले आहेत. त्याने 12 ऑक्टोंबरला सौराष्ट्रविरुद्ध 19 धावा देत 5 गडी बाद केले होते. आतापर्यंत त्याला एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही.
आयपीएलमध्ये केकेआरकडून खेळणाऱ्या प्रसिद्ध कृष्णाने 18 सामन्यात 14 गडी बाद केले आहेत. 2018 मध्ये आयपीएल कारकिर्द सुरु करणाऱ्या कृष्णाने पहिल्या हंगामात 7 सामन्यात 10 गडी बाद केले होते.
Post a Comment