चीनची घुसखोरी, भारतानं तैनात केली युद्धनौका!
![]() |
चीनची घुसखोरी, भारतानं तैनात केली युद्धनौका! |
चीनच्या भारताविरोधातल्या कुरापती काही केल्या थांबत नाहीत. भारताला वारंवार डिवचण्याचा चीनकडून प्रयत्न सुरु असतो. सीमारेषा ओलांडून घुसखोरी करणारे चीनी सैनिक वारंवार आगळीक करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यातच आता समुद्रातही चीनकडून भारताला डिवचण्याचा प्रयत्न केला जातोय. पण चीनने कितीही कुरघोड्या केल्या तरी त्याला भारतीय सैन्याकडून चोख प्रत्युत्तर आत्तापर्यंत दिलं गेलं आहे. पण तरीही भारताबद्दलची चीनची खुमखुमी काही कमी होत नाही. काही दिवसांपूर्वी हिंदी महासागरातील पश्चिम भागात चीनच्या मासेमारी करणाऱ्या एक जहाजानं घुसखोरी केली. या जहाजासोबत चीनची युद्धनौकाही होती हे विशेष.
सूत्रांच्या माहितीनुसार, चीनची घुसखोरी हाणून पाडण्यासाठी भारतीय नौदलानंही जशास तसं उत्तर दिलंय. भारतानंही आपली एक विमानवाहू युद्धनौका आणि एक फायटर प्लेन तैनात केलं. मासेमारी करणारं जहाज हे चीनच्या सैन्याचाच एक भाग असतं. हे जहाज चीनच्या सीमेपासून दूर मासेमारी करण्यासाठी मोरोक्कोच्या दिशेनं निघालं होतं. भारताच्या दृष्टीनं हिंदी महासागरातला पश्चिमी भाग अत्यंत संवेदनशील आणि महत्वाचा आहे. याच प्रदेशातून भारत अमेरिका, युरोप आणि आशिया खंडातील इतर देशांच्या संपर्कात राहातो. सामरिक शक्तीच्या आणि रणनीतीच्या दृष्टीनंही हा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे.
नौदलातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नौदल 24 तास या भागातील चीनच्या हालचालींवर डोळ्यात तेल घालून नजर ठेवून आहे. भारताच्या नौदलातील अमेरिकन पी- 81 ही पानबुडी आणि उपग्रहाची या भागातून जाणाऱ्या प्रत्येक चिनी आणि पाकिस्तानी जहाजांवर करडी नजर आहे. यात चीनच्या अँटी पायरसी पॅट्रोल युनिटचाही समावेश आहे. याच मार्गानं हे युनिट फिरत असतं.
Post a Comment