भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये 'सोशल वॉर'
जेएनयूमधील विद्यार्थ्यांवरील हल्लासंदर्भातील आंदोलन आणि काश्मीरच्या मुद्द्यावरून जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगलीच जुंपली आहे. जेएनयूबाबतच्या आंदोलनात फ्री काश्मीरचं पोस्टर झळकावल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर टीका केली होती. त्याला जयंत पाटलांनी प्रत्युत्तर दिलं. त्यावर आता पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांनी पलटवार केला आहे.
'आता फुटीरतावादी प्रवृत्तींना सरकारचा वकील मिळतो. जयंतराव, हे व्होट बँकेचं राजकारण तुमच्याकडून अपेक्षित नाही. काश्मीरला यापूर्वीच भेदभावापासून मुक्त केले गेले आहे आणि सुरक्षेच्या कारणास्तव तिथं गेल्या अनेक दशकांपासून काही निर्बंध आहेत. आम्ही सरकार असो किंवा विरोधी पक्षात...आमच्यासाठी राष्ट्र प्रथम, हेच तत्व आहे,' असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी जयंत पाटलांवर हल्लाबोल केला आहे.
काय म्हणाले होते जयंत पाटील?
'फ्री काश्मीर' म्हणजे सर्व प्रकारचे भेदभाव, मोबाईल नेटवर्कवरची बंदी ते केंद्राच्या नियंत्रणापर्यंत सगळ्याच गोष्टीबाबत काश्मीर मोकळा हवा आहे, असा त्याचा अर्थ आहे. तुमच्या सारख्या एका जबाबदार नेता द्वेषयुक्त पद्धतीने अर्थ लावून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय यावर माझा विश्वास बसत नाही. असं सत्ता गेल्यामुळे होतंय की स्वनियंत्रण गेल्याचा परिणाम आहे,' असा बोचरा सवालही जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना विचारला आहे.
काय आहे वादाचं नेमकं कारण?
दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (JNU)विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर गेटवे ऑफ इंडियासमोर तरुणांनी आंदोलन केलं. या आंदोलनादरम्यान झळकावण्यात आलेल्या 'फ्री काश्मीर' पोस्टरमुळे वाद निर्माण झाला आहे. या फलकावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील ठाकरे सरकारवर टीका केली होती.
देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकारावरून उद्धव ठाकरे यांना सवाल केला होता. मुख्यमंत्री कार्यालयापासून केवळ 2 किमी अंतरावर ही प्रदर्शने होत आहेत. तुम्ही हे कसं खपवून घेत आहात, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना केला होता.
Post a Comment