‘माझ्यामुळे नव्हे तर शामीमुळे जिंकलो’ - रोहित शर्मा

‘माझ्यामुळे नव्हे तर शामीमुळे जिंकलो’ - रोहित शर्मा
अत्यंत रोमहर्षक आणि अटीतटीच्या झालेल्या भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसऱ्या टी-२० सामन्यात सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या दोन चेंडूंवर दोन षटकार ठोकत भारताला विजय मिळवून देणाऱ्या रोहित शर्माने विजयाचं श्रेय जलदगती गोलंदाज मोहम्मद शामीला दिलं. या सामन्यासाठी रोहित शर्माला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. पण सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना, ‘भारताचा विजय शामीनेच निश्चित केला होता, शामीने टाकलेल्या अखेरच्या षटकामुळे सामन्याचं चित्र पलटलं, त्यामुळेच सामना सुपर ओव्हरमध्ये गेला आणि अखेर भारत जिंकला’ असे रोहित म्हणाला.
“ज्याप्रकारे ते फलंदाजी करत होते त्यावरुन हा सामना सुपर ओव्हरमध्ये जाईल असं आम्हाला वाटलंच नव्हतं. एकवेळ तर ते सहज सामना खिशात घालतील असे वाटत होते. पण शामीचे अखेरचे षटक निर्णायक ठरले. खरं म्हणजे माझ्या दोन षटकारांमुळे नाही तर शामीच्या त्या षटकामुळेच आम्ही सामना जिंकलो…ती ओव्हर टाकण्यासाठी आणि सामना भारताच्या बाजूने झुकवण्यासाठी शामीला सलाम”, अशा शब्दात रोहित शर्माने शामीचे कौतुक केले.
सुपर ओव्हरमध्ये भारताला जिंकण्यासाठी १८ धावा हव्या होत्या. के. एल. राहूलनं मारलेल्या एका चौकाराखेरीज एकही मोठा फटका दोघांनाही चार चेंडूंमध्ये खेळता आला नव्हता. त्यामुळे चार धावांमध्ये अवघ्या आठ धावा झाल्या व शेवटच्या दोन चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी १० धावांची गरज होती. गोलंदाज सौदी टिच्चून गोलंदाजी करत होता. मात्र रोहितला अपेक्षित असलेली चूक सौदीनं केली आणि त्यानं पाचवा चेंडू ओव्हर पिच टाकला, ज्यावर रोहितनं लाँग ऑनला उत्तुंग षटकार ठोकला. शेवटच्या चेंडूवर जिंकण्यासाठी भारताला चार धावा हव्या असताना पुन्हा सौदीनं ओव्हरपिच पण यावेळी ऑफ स्टम्पच्या बाहेर चेंडू टाकला जो रोहितनं लाँग ऑफच्या बाहेर भिरकावत सहा धावा वसूल केल्या व भारतानं सामन्यासह मालिका जिंकली.

No comments

Powered by Blogger.