साध्वी प्रज्ञासिंह यांना पाठवलेल्या पत्रात मोदी, डोवालांच्या फोटोंवर लाल फुली

साध्वी प्रज्ञासिंह यांना पाठवलेल्या पत्रात मोदी, डोवालांच्या फोटोंवर लाल फुली

भाेपाळच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांना पाठवण्यात आलेल्या एका संशयास्पद पत्रात पंतप्रधान नरेंद्र माेदी, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डाेवाल आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री याेगी आदित्यनाथ यांच्या फाेटाेवर लाल पेनने आक्षेपार्ह खुणा केल्याचे दिसून आले आहे.
या पत्रासाेबत खाज सुटणाऱ्या पावडरची दोन पाकिटे हाेती. भाेपाळ पाेलिसांनी या प्रकरणाचा शाेध घेतला असता हे पत्र पुणे शहराजवळील खडकी येथील शिवाजी चाैकातून पाठवण्यात आल्याची बाब समाेर आली असून संबंधित व्यक्तीचा पाेलिस शाेध घेत आहेत.
या पत्रावर पत्र पाठवणाऱ्या व्यक्तीचे नाव स्वामी रामचंद्र अय्यर ईश्वरचंद्र असे असून पत्रातील मजकूर उर्दू भाषेत आहे. खडकी येथून संबंधित संशयास्पद पत्र भाेपाळच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांना पाठवण्यात आले. यामध्ये पंतप्रधान माेदी, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डाेवाल आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री याेगी आदित्यनाथ यांच्या फाेटाेंवर लाल पेनने फुल्या मारलेल्या असल्याने तसेच सर्वांवर बंदूक राेखण्यात आल्याचे चित्र हाेते. त्यामुळे पाेलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत त्याचा तपास सुरू केला आहे.
भाेपाळ पाेलिसांनी हे पत्र आणि पावडर फाॅरेन्सिक सायन्स लॅबाेरेटरीमध्ये तपासणीकरिता पाठवली आहे. मात्र, याबाबत अद्याप काेणत्याही तपास यंत्रणेने पुणे पाेलिसांशी संपर्क साधला नसल्याची माहिती विशेष शाखेचे पाेलिस उपायुक्त मितेश घट्टे यांनी दिली.
साध्वी प्रज्ञासिंह यांच्यावर २००८ मध्ये मालेगाव येथे झालेल्या बाॅम्बस्फाेटाचा गुन्हा दाखल असून अनेक वर्षे कारागृहात घालवल्यानंतर भाजपतर्फे भाेपाळमधून त्या खासदार म्हणून निवडून आलेल्या आहेत.

No comments

Powered by Blogger.