“मजबूत आरमार उभारण्यापासून ते…”; शिवजयंतीनिमित्त मोदींनी वाहिली अनोखी श्रद्धांजली

“महान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनी त्यांना नमन!,” अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी छत्रपती शिवाजी महाराजांना शिवजयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे. शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्यासमोर नतमस्तक होतानाचा मोदींचा फोटो ट्विट करण्यात आला आहे. आज देशभरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली जात आहे. राज्यातील अनेक गडकिल्ल्यांवर शिवजयंतीनिमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. महाजारांचे जन्मस्थान असणाऱ्या शिवनेरी किल्ल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उप-मुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराजांच्या स्मृतींना अभिवादन केलं.
काय म्हणाले मोदी
महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्यासमोर नतमस्तक होणारा फोटो मोदींनी ट्विट केला आहे. “भारत मातेच्या महान सुपुत्रांपैकी असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन. शौर्य, करुणा आणि उत्तम प्रशासक याचे मुर्तीमंत उदाहरण असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाजारांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. आजही त्यांचे जीवनकार्य लाखो लोकांना प्रेरणा देत आहे,” असं ट्विट मोदींनी केलं आहे.
“छत्रपती शिवाजी महाराजांनी एक शूर योद्धा आणि उत्कृष्ट प्रशासक म्हणून आपली छाप पाडली. एक मजबूत आरमार उभं करण्यापासून ते लोकाभिमूख धोरणे आखण्यापर्यंत शिवाजी महाराज सर्व क्षेत्रात उत्कृष्ट होते. महाराज अन्याय आणि दहशत पसरवणाऱ्यांना विरोध करण्याच्या त्यांच्या भूमिकेसाठी नेहमीच स्मरणात राहील,” असं मोदींनी पुढल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
सर्वच सोशल नेटवर्किंग साईटवरही शिवजयंतीनिमित्त अनेकांनी वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत महाराजांबद्दल आपल्या भावना व्यक्त करताना दिसत आहेत. ट्विटवरही #ShivajiMaharaj, #ShivJayanti, #छत्रपतीशिवाजीमहाराज, #शिवजयंती, #ShivajiMaharajJayanti, #Shivaji हे हॅशटॅग ट्रेण्ड होताना दिसत आहेत.

No comments

Powered by Blogger.