शुटिंगदरम्यान क्रेन कोसळल्यामुळे मोठा अपघात,तिघांचा मृत्यू, १० जखमी
दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हसन यांच्या ‘इंडियन २’ या चित्रपटाच्या
शुटिंगदरम्यान क्रेन कोसळल्यामुळे मोठा अपघात झाला. या अपघातामध्ये तिघांचा
मृत्यू झाला आहे तर १० जण जखमी झाले आहेत. अपघातामध्ये दिग्दर्शक शंकर
पर्सनल दिग्दर्शक मधु (२९ वर्ष), सहाय्यक दिग्दर्शक कृष्णा (३४ वर्ष) आणि
एक कर्मचारी चंद्रन (६० वर्ष) यांचा मृत्यू झाला आहे. या भयानक अपघातावेळी
अभिनेता कमल हसन सेटवरच उपस्थित होते. ते सुखरूप आहेत. अभिनेता कमल हसन
यांनी ट्विट करत या अपघाताबाबत दुख व्यक्त केलं आहे.
‘इंडियन २’ या चित्रपटाचे शूटिंग चेन्नईजवळ ईव्हीपी एस्टेट स्पॉटवर सुरू
होते. बुधवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास हा दुर्देवी अपघात झाला.
अपघातातील जखमींना उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले
आहे. रिपोर्ट्सनुसार, कमल हसन यांनी रूग्णालयात जाऊन जखमींची विचापूस केली.
कमल हसन यांनी तामिळमध्ये ट्विट करत अपघाताविषयी दुख व्यक्त केलं आहे. आज
झालेल्या भयावह अपघातामध्ये मी तीन जोडीदार गमावले. त्यांच्या परिवाराच्या
दुखा:त मी सोबत असून माझी सहानभूती त्यांच्यासोबत आहे.
‘इंडियन २’ हा चित्रपट १९९६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘इंडियन’ या
चित्रपटाचा सिक्वल असणार आहे. ‘इंडियन’ या चित्रपटात कमल हसन, मनिषा
कोइराला आणि उर्मिला मातोंडकर यांच्या मुख्य भूमिका होत्या. या चित्रपटाने
तीन राष्ट्रीय पुरस्कार पटकावले होते. ‘इंडियन २’ हा कमल हसन यांच्या
करिअरमधला अखेरचा चित्रपट ठरणार आहे. कारण या चित्रपटानंतर अभिनय कायमचा
सोडणार असल्याचं खुद्द कमल हासन यांनीच स्पष्ट केलं होतं. त्यामुळे या
चित्रपटाविषयी प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता आहे.
Post a Comment