माथेफिरू तरुणाचा महिला डॉक्टरसह तिघींवर अॅसिड हल्ला
![]() |
माथेफिरू तरुणाचा महिला डॉक्टरसह तिघींवर अॅसिड हल्ला |
हिंगणघाटमध्ये एका प्राध्यापिकेला जाळून ठार मारण्याची घटना ताजी असतानाच आता नागपूर जिल्ह्य़ातील सावनेरच्या पहिलेपार येथे एका माथेफिरू तरुणाने ‘मेडिकल रुग्णालया’तील एका डॉक्टर साहाय्यक प्राध्यापिकेसह इतर दोन महिलांवर अॅसिड फेकले. त्यात डॉक्टरसह इतर दोन महिला किरकोळ जखमी झाल्या. उपस्थितांनी आरोपीला चोप देत पोलिसांच्या हवाली केले. ही घटना आज गुरुवारी दुपारी घडली.
नीलेश कन्हेरे (२२) असे आरोपीचे नाव आहे. पीडिता नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) सामाजिक रोगप्रतिबंधकशास्त्र विभागात कंत्राटी साहाय्यक प्राध्यापिका आहे. ती एका प्रकल्पाच्या सर्वेक्षणासाठी सावनेरला गेली होती. तिच्या मदतीला दोन निवासी डॉक्टरसह इतर कर्मचारी होते. सर्वेक्षण करीत असताना नीलेशने आधी डॉक्टरांच्या वाहनावर अॅसिड टाकले. त्यानंतर तो पीडित प्राध्यापिकेच्या जवळ आला. त्याने तिच्या चेहऱ्याच्या दिशेने अॅसिड भिरकावले. यात दोघांना किरकोळ जखम झाली. त्यानंतर पुन्हा आरोपीने पुढे एका १४ वर्षीय मुलीच्या गळ्यावर अॅसिड फेकल्याने तिही जखमी झाली. हा प्रकार बघून उपस्थितांनी आरोपीला पकडून चांगलाच चोप दिला आणि त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. आरोपीला शिक्षेची मागणी करत उपस्थितांनी पोलीस ठाण्यात काही वेळ गोंधळ घातला.
दुसऱ्या तरुणीवर अॅसिड टाकायचे होते?
उपस्थित डॉक्टरांनी पोलिसांत तक्रारीसाठी सावनेर पोलीस ठाणे गाठले. येथे आरोपीने त्यांच्यापुढे मद्याच्या नशेत दुसऱ्या तरुणीवर अॅसिड टाकायचे असल्याचे सांगितले. परंतु वारंवार तो आपला जवाब बदलत असल्याने शुद्धीवर आल्यावरच त्याने हे कृत्य का केले, हे स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
Post a Comment