धरणाशेजारी घातक रसायन
वाणगाव-चारोटी राज्यमार्गालगत साखरा धरणाशेजारी निर्जनस्थळी शेकडो टन
घातक रसायन फेकलेल्या मलवाहक टँकर साखरा ग्रामस्थांनी पकडला. या वेळी
संतप्त जमावाने टँकरचालकास मारहाण केली. त्यानंतर उर्वरित घनकचरा घेऊन टँकर
चारोटीमार्गे वापीकडे निघून गेल्याची माहिती पोलिसांनी दिली.
डहाणू नगर परिषद, बाडा पोखरण योजना, टॅप्स, एमआयडीसीला पाणी पुरवठा
करणाऱ्या साखरा धरणाच्या सांडव्याजवळ घनकचरा टाकण्यात आल्याचे निदर्शनास
आले. धरणाशेजारी घातक रसायन पसरल्याने धरणा शेजारील गावात दुर्गंधी पसरली
होती. नागरिकांना डोळ्यांत जळजळ जाणवू लागल्याने काही वेळी या भागात भीतीचे
वातावरण पसरले होते. मात्र याप्रकरणी पोलिसांत तक्रार नोंदविण्यात आली
नसल्याची माहिती वाणगाव पोलिसांनी दिली.
बोईसर-पंचाळी तसेच चिंचणीहून वाणगाव मार्गे चारोटीकडे जाणारा राज्यमार्ग
आहे. या मार्गावर रात्रीच्या सुमारास धरणाशेजारी घातक रसायनाच्या
दुर्गंधीचा त्रास जाणवू लागल्याने काही ग्रामस्थांनी त्याचा शोध घेण्याचा
प्रयत्न सुरू केला. तेव्हा गेले १५ दिवस रात्रीच्या वेळेत बोईसर येथील
कारखान्यांमधून आणलेले घातक रसायन टाकले जात असल्याचे स्थानिकांना आढळले.
त्यानंतर रहिवाशांनी शनिवार, २५ जानेवारी रोजी रात्री धरणाशेजारी रात्री
गस्त घालण्यास सुरुवात केली. २७ जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास एका बंद
टँकरमधून घातक रसायन टाकत असताना चालक व त्यांच्यासह असलेल्या साथीदाराला
पकडले. त्यांची अधिक चौकशी केली असता असता बोईसर येथील ‘सेरेक्स’ या
कारखान्यातून हे घातक रसायन आणल्याचे चालकाने सांगितले.
साखरा धरणातून डहाणू नगरपरिषदला पिण्याच्या पाण्याच्या पुरवठा केला जातो.
तसेच बाडापोखरण नळपाणी योजनेत डहाणू तालुक्यातील २६ गावे आणि पालघर
तालुक्यातील तीन गावे आणि चार पाडय़ांना पाणी पुरवले जाते आहे. धरणातील
पाण्यात घातक रसायन मिसळल्यास धरण पाणीसाठा दूषित होऊन मानवी आरोग्य आणि
जलजीव आणि वन्यप्राण्यांच्या आरोग्याला घातक आहे. त्यामुळे घातक रसायन
सोडणाऱ्या कंपनीविरुद्ध कारवाईची मागणी साखरा येथील स्थानिक नागरिकांनी
केली आहे.
Post a Comment