त्या महिलेला मोदीच करतात फॉलो

त्या महिलेला मोदीच करतात फॉलो

दिल्लीमधील शाहीन बाग येथे सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात डिसेंबर महिन्यापासून आंदोलन सुरु आहे. बुधवारीही शेकडो महिला येथे आंदोलन करत असतानाच अचानक काही पोलीस आंदोलनाच्या ठिकाणी आले आणि बुरख्यातील एका महिलेला त्यांनी ताब्यात घेतलं. पोलिसांनी चौकशी केली असता या महिलेचे नाव गुंजन कपूर असे असल्याची माहिती समोर आली. गुंजनही भाजपा समर्थक असून ती स्तंभ लेखिका असण्याबरोबरच युट्यूबवरील ‘द राईट नरेटीव्ह’ हे चॅनेलही चालवते. ती स्वत:ला भारताला विश्वगुरु बनवण्यासाठीची कार्यकर्ता असल्याचं सांगते. धक्कादायक बाब म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुंजनला ट्विटवर फॉलो करत असल्याची माहितीही समोर आली आहे. बंगळुरुमधील खासदार तेजस्वी सुर्याही तिला ट्विटवर फॉलो करतात.
आंदोलनाच्या ठिकाणी असणाऱ्या प्रत्यक्षदर्शिंनी दिलेल्या माहितीनुसार बुरख्यात आलेली गुंजन अती जास्त प्रश्न विचारु लागल्याने आंदोलनकर्त्या महिलांना तिच्याबद्दल शंका आली आणि त्यानंतर संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. गुंजनची तपासणी केली असता तीच्याकडे एक छुपा कॅमेरा अढळून आला. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी एकच गोंधळ सुरु केला. गोंधळ पाहून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी गुंजनला ताब्यात घेतलं. या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनेही हा व्हिडिओ ट्विट केला आहे.
बुरखा घालून आंदोलनाच्या ठिकाणी जाण्यासंदर्भात गुंजनकडे चौकशी करण्यात आली असता “शाहीन बाग येथे गोळीबार करणारा कपील गुज्जर हा आपचा कार्यकर्ता असल्याचे लक्षात आल्यानंतर येथील आंदोलकांवर आपच्या कार्यकर्त्याने गोळीबार का केला असेल हे जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली. या आधी मी कधीच कोणत्या आंदोलनात सहभागी झाले नव्हते. मी शाहीन बागमध्येही पहिल्यांदाच गेले होते,” असं गुंजनने सांगितलं. “मी बुरखा घालून गेल्यास येथील आंदोलनकर्त्या महिल्या माझ्याशी मनमोकळेपणे बोलतील असं मला वाटलं होतं,” असंही गुंजनने स्पष्ट केलं. अनेकांनी ट्विटवरुन तिच्या या दाव्यांबद्दल शंका उपस्थित केली आहे. तिचे नाव ट्विटवर बऱ्याच काळ ट्रेण्ड होत होते. तिच्या नावाचा हॅशटॅग वापरुन बुधवारी रात्रीपर्यंत ३० हजारहून अधिक ट्विटस करण्यात आले होते. 

No comments

Powered by Blogger.