बाेर्डावर मजकूर लिहून चाेरटे पळाले.

सुलतानपुरातील दीपक चव्हाण यांची देवळाणा खुर्द शिवारात शेतवस्ती आहे. तेथे ते आई, वडील, भाऊ व कुटुंबासह वास्तव्यास आहेत. रविवारच्या रात्री बारापर्यंत कुटुंब जागे होते. त्यानंतर सर्व झोपी गेले. सोमवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास अज्ञात चोरांनी त्यांच्या घराचा मुख्य दरवाजा लोखंडी टाॅमीने तोडून आत प्रवेश केला. बैठक हॉलच्या बाजूला दीपक चव्हाण यांच्या बेडरूमचा दरवाजा नायलॉन चऱ्हाटाने बांधून ठेवला. नंतर संपूर्ण घराची झडती घेतली. त्यात त्यांना पॅन्टच्या खिशात २३ हजार रोख रक्कम सापडली. त्यानंतर घरात आणखी काही सापडले नाही म्हणून त्यांनी चव्हाण यांच्या बेडरूमचा दरवाजा उघडला. ते झोपलेल्या पलंगाखालून लोखंडी पेटी काढून त्यातील अडीच तोळे सोन्याच्या पुतळ्या काढून घेतल्या. बाजूचेे लोखंडी कपाट उघडण्याचा प्रयत्न करीत असताना कपाटाचा आवाज आल्याने दीपक चव्हाण यांना जाग आली. समोर चोरटे बघून त्यांची भंबेरी उडाली. त्यांनी आरडाओरड करताच चोरांनी पलायन केले.
खुलताबाद तालुक्यातील सुलतानपूर-देवळाणा खुर्द शिवारातील गट क्र.३८ मधील दीपक चव्हाण यांच्या राहत्या शेतवस्तीवर सोमवारी (दि.३) पहाट चोरीची घटना घडली. कामाच्या नियोजनासाठी शेतकऱ्याने घरासमोर लावलेल्या बाेर्डावर चाेरट्यांनी ‘मी चाेरी केली ओळखून घे’, असा तुटक्या मराठीत मजकूर लिहून पळ काढला.

बाेर्डावर चाेरट्यांनी लिहिला मजकूर... :
चव्हाण यांच्या शेती नियोजनाचा भाग म्हणून घराच्या समोरील भिंतीवरील बोर्डवर दैनंदिन कामाचा आढावा लिहिला जातो. तसेच कुटुंबातील सदस्य व शेत मजुरांसाठी सूचनाही लिहिल्या जातात. याच बोर्डवर चोरांनी ‘ मी चाेरी केली ओळखून घे.’ असा मजकूर लिहून पोबारा केला.

No comments

Powered by Blogger.