भर चौकात तरुण शिक्षिकेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

भर चौकात तरुण शिक्षिकेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न


वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट इथे एका तरुणीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी शाळेमध्ये शिक्षिका आहे. तरुणीचं वय 30वर्षे असल्याची माहिती आहे. आज सकाळी 7.30 वाजता ही घटना घडली आहे. यामध्ये तरुणी 20 ते 30 टक्के भाजली असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे.
महाराष्ट्रामध्ये 2 दिवसांमध्ये 2 धक्कादायक घटना घडल्या आहेत. यावरून आता राज्यात कायद्याची भीती राहिलीच नाही असंच म्हणावे लागेल. रविवारी खटाव ( तालुका पलूस ) येथील राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते आनंदराव पाटील यांच्यावर दोघा अज्ञात व्यक्तीनी खुनी हल्ला केला ज्यात आनंदराव यांचा मृत्यू झाला. तर आज वर्ध्यामध्ये माणुसकीला भूईसपाट करणारी एक बातमी समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळच्या सुमारास तरुणीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. नंदोरी नाक्याजवळ पीडित तरुणीच्या गावातील 2 तरुण आणि पीडिता यांच्या शाब्दिक वाद झाला. त्यानंतर तरुणांनी तिला भर रस्त्यात अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिलं. घटना घडल्यानंतर आरोपी फरार झाले असल्याचं सांगण्यात येत आहे.
स्थानिकांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी पीडितेला वाचवलं आणि तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेला उपचारार्थ नागपूर येथे दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची पोलिसांत नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
आनंद पाटील यांच्यावर हल्ला करून हल्लेखोर मोटरसायकलवर पसार झाले. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. खटाव -भिलवडी रस्त्यावर असलेल्या आपल्या शेतातून आनंदराव पाटील हे परतत असताना साडेअकराच्या सुमारास त्यांच्यावर हल्ला झाला. पाटील यांच्या डोक्यावर धारदार शस्त्राने जोरदार हल्ला झाल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं.
आनंदराव पाटील हे राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे स्वीय सहाय्यक गजानन पाटील यांचे बंधू आहेत. या हत्याकांडाने सांगलीमध्ये खळबळ उडाली.

No comments

Powered by Blogger.