राहुल गांधी यांनी इटलीवरुन परतल्यानंतर आपण करोनाची चाचणी केली का ?
इटलीहून भारतात परतलेले काँग्रेस नेता राहुल गांधी यांनी बुधवारी
दिल्लीमधील हिंसाचारग्रस्त भागांचा दौरा केला. यावरुन भाजपाने राहुल
गांधींवर टीका केली आहे. भाजपा खासदार रमेश बिधुरीयांनी राहुल गांधींवर
निशाणा साधत म्हटलं आहे की, “त्यांनी सर्वात आधी आपण इटलीवरुन परतल्यानंतर
आपण करोनाची चाचणी केली का ? हे सांगावं”. राहुल गांधी यांनी भारतात
परतल्यानंतर सर्वात आधी आपली तपासणी करुन घ्यायला हवी होती असंही ते
म्हणाले आहेत. करोना विषाणूचा प्रादुर्भाव झालेल्या देशांमध्ये इटलीचाही
समावेश आहे. इटलीमध्ये करोनाची लागण झाल्याने आतापर्यंत १०० जणांचा मृत्यू
झाला आहे.
संसद परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलताना रमेश बिधुरी यांनी म्हटलं की,
“राहुल गांधी नुकतेच इटलीवरुन परतले आहेत. विमानतळावर त्यांची तपासणी झाली
की नाही मला माहित नाही. करोना व्हायरस संसर्गजन्य रोग आहे. लोकांमध्ये
जाण्याआधी त्यांनी आपण करोना व्हायरसची चाचणी केली की नाही हे सांगायला
हवं. लोकांच्या सुरक्षेसाठी हे आवश्यक आहे”.
राहुल गांधी यांनी बुधवारी दिल्लीतील हिंसाचारग्रस्त भागाचा दौरा केला.
यावेळी ब्रजपुरी येथे आंदोलकांनी जाळलेल्या शाळेच्या बाहेर
प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटलं की, “ही शाळा भारताचं भविष्य आहे,
द्वेष आणि हिंसेने तिला संपवलं जात आहे. यामुळे कोणाचाच फायदा झालेला
नाही. हिंसा आणि द्वेष विकासाचे शत्रु आहेत. भारताची विभागणी केली जात आहे.
भारताला जाळलं जात आहे. यामुळे भारतमातेला काहीही फायदा होणार नाही.
सर्वांनी मिळून प्रेमाने एकत्र काम केलं पाहिजे”.
Post a Comment