अलिबागच्या मांडवा जेट्टीजवळ बोट बुडाली

गेट वे ऑफ इंडियावरुन अलिबागला जाणारी एक प्रवासी बोट बुडाली आहे. शनिवारी सकाळी १०.३० च्या सुमारास ही दुर्देवी घटना घडली. मांडवा जेट्टीपासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर असताना ही बोट बुडाली. अंजठा कंपनीच्या मालकीची ही बोट होती. बोटीमध्ये एकूण ८८ प्रवासी होते.
बोटीतील सर्व प्रवाशांना वाचवण्यात आले आहे. जेट्टीजवळ पोहोचत असताना अचानक ही बोट एका बाजूला कलंडली. बोट बुडत असल्याचे लक्षात येताच तिथे असलेली पोलिसांची पेट्रोलिंग बोट मदतीला धावून गेली. पोलिसांच्या पेट्रोलिंग बोटीवरुन ८० प्रवाशांना सुखरुप जेट्टीवर पोहोचवण्यात आले. अन्य आठ जणांना स्पी़ड बोटीच्या मदतीने किनाऱ्यावर पोहोचवण्यात आले.
अजंठा कंपनीची ही लाकडी बोट होती. या बोटीची प्रवासी वहनक्षमता ९५ आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे अंजठा बोटीतील प्रवाशी हादरुन गेले. सुदैवाने त्यावेळी पोलिसांची पेट्रोलिंग बोट तिथे असल्याने सर्व निभावले. बोट कशामुळे बुडाली ते अजून स्पष्ट झालेले नाही. तीन ते चार कंपन्या गेट वे ते मांडवा प्रवासी वाहतूक करतात. इतर दिवसांपेक्षा शनिवार-रविवार अलिबागला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असते.

No comments

Powered by Blogger.