आयफा ला करोनाचा फटका

यंदाच्या इंटरनॅशनल इंडियन फिल्म अॅकॅडमी अर्थात आयफा पुरस्कार सोहळ्याला करोना व्हायरसचा फटका बसला आहे. यंदाचा हा पुरस्कार सोहळा भारतातील मध्य प्रदेशमध्ये आयोजित करण्यात आला आहे. मात्र चीनसह जगभरात उद्रेक झालेल्या करोना व्हायरसने भारतातही शिरकाव केला आहे. त्यामुळे आयफा पुरस्कारांच्या आयोजकांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आयोजकांनी पुरस्कार सोहळ्याची तारीख बदलण्याचा निर्णय घेतला आहे.
मध्य प्रदेशमध्ये मार्च महिन्याच्या अखेरीस आयफा पुरस्कार सोहळा संपन्न होणार होता. या सोहळ्यात जगभरातून कलाविश्वातील अनेक दिग्गज व्यक्ती सहभागी होणार होती. मात्र, करोनामुळे या सोहळ्याची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. आयफाच्या आयोजकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून याविषयी अधिकृत माहिती दिली आहे.
जगभरात पसरत चाललेला करोना व्हायरस आणि आयफाचे चाहते, सर्वसामान्य नागरिक यांच्या आरोग्याचा विचार करुन आयफाच्या कार्यकारिणींनी आणि कलाविश्वातील काही दिग्गजांबरोबर चर्चा करुन या पुरस्कार सोहळ्याची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असं आयफा आयोजकांनी ट्विट करुन माहिती दिली.
भारतात करोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढताना दिसतो आहे. कारण या व्हायरसची लागण झालेल्या भारतातील रुग्णांची संख्या आता पाचवर पोहोचल्याचं सांगण्यात येत आहे. दिल्ली आणि हैदराबाद येथे दोन नवे रुग्ण आढळून आले आहेत.

No comments

Powered by Blogger.