नवे सरकार, नवी पुस्तके, नवा अभ्यासक्रम
गेल्याच वर्षी बदललेली पहिलीची पुस्तके आता पुढील शैक्षणिक वर्षी
(२०२१-२२) पुन्हा बदलणार आहेत. महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ
(एमआयईबी) बंद केल्यानंतर आता शिक्षण विभागाने सर्वच शाळांचा अभ्यासक्रम
आंतरराष्ट्रीय दर्जाचा करण्याचे जाहीर केले असून त्यानुसार पुस्तके
बदलण्यात येणार आहेत. दरम्यान सध्या ‘एमआयईबी’शी संलग्न असलेल्या शाळांसाठी
पाचवीची पुस्तके यंदाच बदलण्यात येणार आहेत.
‘नवे शासन, नवा अभ्यासक्रम, नवी पुस्तके’ अशी प्रथा कायम राखत या
शासनानेही पुढील वर्षांपासून पहिलीपासून पाठय़पुस्तके बदलण्याचा निर्णय
घेतला आहे. यापूर्वीच्या सरकारने राज्यमंडळाची पुस्तके बदलण्याबरोबरच
राज्याचे स्वतंत्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ स्थापन केले. स्थापनेपासून
अभ्यासक्रमापर्यंत सर्वच बाबतीत हे मंडळ वादग्रस्त ठरले. आंतरराष्ट्रीय
मंडळ बंद केल्यानंतर आता राज्यमंडळाचीच पाठय़पुस्तके आंतरराष्ट्रीय दर्जाची
करण्याचे शासनाने जाहीर केले आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षां गायकवाड
यांनी याबाबत पत्र काढले आहे.
दरम्यान राज्यात यापुढे एकच शिक्षण मंडळ कार्यरत राहील. राज्यातील
आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ बंद करण्यात आले असले तरी त्याच्याशी संलग्न
शाळा या राज्यमंडळाच्या आखत्यारित सुरूच राहणार आहेत. राज्यात ६६ हजार ३३
शाळांपैकी ८१ शाळा आंतरराष्ट्रीय मंडळाशी संलग्न करण्यात आल्या होत्या. या
शाळा बंद होणार नाहीत, असे गायकवाड यांनी स्पष्ट केले.
मंडळ बंद, अभ्यासक्रम कायम?
काही शाळांसाठी वेगळा अभ्यासक्रम असा प्रघात मोडीत काढणे हा
आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ बंद करण्यामागचा हेतू होता, असे विभागाचे म्हणणे
आहे. काही शाळांना वेगळा अभ्यासक्रम आणि पाठय़पुस्तके लागू करण्यावरूनच हे
मंडळ वादात सापडले होते. असे असताना सध्या असलेल्या ८१ शाळांमध्ये
राज्यमंडळाचा अभ्यासक्रम न लागू करता पुन्हा वेगळाच अभ्यासक्रम लागू
करण्याचा घाट विभागाने घातला आहे. सर्व शाळांसाठी नवी पाठय़पुस्तके पुढील
वर्षांपासून लागू करण्यात येणार असली तरी एमआयईबीच्या ८१ शाळांमध्ये
पाचवीची पाठय़पुस्तके येत्या शैक्षणिक वर्षांपासूनच (जून २०२०) बदलण्यात
येणार आहेत. त्यामुळे मंडळ एक असले तरी विद्यार्थ्यांमधील दुजाभाव कायम
राहणार असल्याचे दिसत आहे. त्याचप्रमाणे पहिली ते चौथीसाठी एमआयईबीने लागू
केलेली, वादग्रस्त ठरलेली पाठय़पुस्तके कायम राहणार का याबाबतही विभागाने
स्पष्ट भूमिका घेतलेली नाही.
होणार काय?
२०२१ पासून पहिलीची पुस्तके बदलण्यात येणार आहेत. त्यासाठी आता ‘राज्य
आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम मंडळ’ तयार करण्यात येणार आहे. मुलांना आनंददायी
आणि रचनात्मक शिक्षण देण्यासाठी शासनाने उपक्रम तयार केले असून ते सर्वच
शाळांमध्ये लवकरात लवकर राबवण्यात येणार आहेत.
राज्यात एकच शिक्षण मंडळ असावे, सर्व विद्यार्थ्यांना सारखेच शिक्षण
मिळावे यासाठी एमआयईबी बंद करण्यात आले. त्यामुळे पालकांमध्ये काही गैरसमज
झाले आहेत. मंडळाच्या शाळा बंद होणार नाहीत. किंबहुना सर्वच शाळांसाठीचा
अभ्यासक्रम आंतरराष्ट्रीय दर्जाचा करण्यात येणार आहे. त्यासाठी बालभारती,
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेची अभ्यास मंडळे,
स्वयंसेवी संस्था यातील तज्ज्ञांचे एकत्रित अभ्यासक्रम मंडळ स्थापून
पुस्तके तयार करण्यात येतील.
– वर्षां गायकवाड, शालेय शिक्षण मंत्री
Post a Comment