राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; राष्ट्रीय आणीबाणी जाहीर

करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा निर्णय घेत राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली आहे. करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना संबोधिक करताना त्यांनी ही घोषणा केली. तसंच याचा सामना करण्यासाठी राज्यांना ५० अब्ज डॉलर्सचा निधी देणार असल्याचंही जाहीर केलं. करोना थांबवण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात आल्या नाहीत तर १५ कोटी लोकांना या आजाराची लागण होऊ शकते, असं मत जाणकारांनी व्यक्त केलं.
“येणाऱ्या काळात आपल्याला काही गोष्टींचा त्याग करावा लागेल. आता त्याग केला तर पुढे आपल्याला त्याचा फायदा होईल. पुढील आठ आठवड्यांचा कालावधी कठिण असेल,” असं ट्रम्प यावेळी म्हणाले. अमेरिकेत आतापर्यंत ११०० पेक्षा अधिक लोकांना करोनाची लागण झाली आहे. तर ४० जणांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी स्पेननही करोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली होती.
करोनासारख्या विषाणूशी लढा सुरू असल्याबद्दल ट्रम्प यांनी आपल्या अधिकाऱ्यांचे आभार मानले. “राष्ट्रीय आणीबाणी हे मोठे शब्द आहेत. या निर्णयाने अमेरिका सरकार आजाराशी लढा देण्यासाठी आपली संपूर्ण ताकद लावेल,” असंही ते म्हणाले.

No comments

Powered by Blogger.