"विरोधकांनी राजकारण करू नये, आम्ही मात्र रोज सामनातून शिमगा करणार" मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर भाजपाची टीका
![]() |
"विरोधकांनी राजकारण करू नये, आम्ही मात्र रोज सामनातून शिमगा करणार" मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर भाजपाची टीका |
करोना आणि लॉकडाउन या दोन्हीमुळे महाराष्ट्राचं जीवनचक्र संथ झालं आहे.
करोनाचा प्रसार थांबवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असताना राज्यात राजकीय
आरोपप्रत्यारोपही सुरू आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी
राज्यातील जनतेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी ही राजकारण करण्याची वेळ
नसल्याचं पुन्हा एकदा सांगितलं. तसंच करोनाविरोधातील लढ्यात सर्वांना एकत्र
येण्याचं आवाहन केलं. भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी एका
व्हिडीओच्या माध्यमातून त्यांच्यावर टीका केली आहे. “विरोधकांनी राजकारण
करू नये, आम्ही मात्र रोज सामनातून शिमगा करणार,” असं म्हणत त्यांनी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
“विरोधकांनी राजकारण करू नये, आम्ही मात्र रोज सामनातून शिमगा करणार,
चिखलफेक करणार. कोरोनाची आकडेवारी आणि वाढता धोका वगळून सर्व विषयांवर
बोलणार. साळसूदपणाचा आव आणून शहाजोग सल्लेही देणार. जनता झापडबंद आहे असे
मानून डोळे बंद करून दूध पिणार,” असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव
ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून उद्धव ठाकरे
यांच्यावर टीका केली आहे.
जनतेला संबोधित करताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन
गडकरी यांचे विशेष आभार मानले होते. गडकरी यांनी सद्यस्थितीत राजकारण नको,
असं आवाहन केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली.
त्याचबरोबर राज्यातील टीका करणाऱ्या नेत्यांना मुख्यमंत्र्यांनी नावं न
घेता सुनावलं होतं.
Post a Comment