Coronavirus | निजामुद्दीन मर्कझचा प्रमुख मौलाना साद फरार

Coronavirus | निजामुद्दीन मर्कझचा प्रमुख मौलाना साद फरार
धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करत नियमांचं उल्लंघन करणाऱ्या आणि करोनाचा फैलाव करणाऱ्या दिल्लीमधील निजामुद्दीन मर्कझचे प्रमुख मौलाना साद फरार आहेत. पोलिसांनी एफआयआर दाखल केल्यानंतर मौलाना साद फरार आहेत. दिल्ली पोलिसांनी इंडिया टुडे वृत्तावाहिनीशी बोलताना दिलेल्या माहितीनुससार, मोहम्मद साद यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची दोन पथकं उत्तर प्रदेशात पाठवण्यात आली आहेत. त्यांच्या नातेवाईकांचीही चौकशी केली जात आहे. मोहम्मद साद यांच्या नातेवाईकांच्या घराचीही छाडाछडती घेण्यात आली आहे.
दरम्यान क्राइम ब्रांचचं दुसरं पथक जिथे मोहम्मद साद जिथे लपले असण्याची शक्यता आहे त्या मशिद आणि इतर ठिकाणी शोध घेत आहेत. दिल्ली पोलिसांनी मोबाइलच्या सहाय्यानेही मोहम्मद साद यांचा ठावठिकाणा शोधण्याचा प्रयत्न केला. पण एफआयआर दाखल केल्यापासून मोहम्मद साद यांनी आपला मोबाइल बंद ठेवला आहे. त्याची एक ऑडिओ क्लिप नुकतीच समोर आली होती ज्यामध्ये त्याने आपण विलगीकरणात असल्याचा दावा केला होता,
क्राइम ब्रांचची टेक्निकल टीम ऑडिओ क्लिपच्या सहाय्याने मोहम्मद साद यांची माहिती मिळते का यासाठी प्रयत्न करत आहेत. दिल्ली पोलिसांनी २४ मार्चच्या आधी मर्कझमधून बाहेर पडलेल्या सर्व भारतीयांची एक यादी तयार करायला सांगितली आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ८२४ परदेशी नागरिकांसहित शेकडो भारतीयांनी दिल्लीमधील निजामुद्दीन येथील मर्कझमध्ये हजेरी लावली होती. दिल्ली पोलीस या सर्वांची माहिती तपास यंत्रणांसोबत शेअऱ करत आहे जेणेकरुन त्यांचा ठावठिकाणा शोधून क्वारंटाइन करण्यात येईल. पोलीस त्या १४ रुग्णालयांच्या संपर्कातही आहेत जिथे मर्कझमध्ये हजर असलेल्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. मशीद रिकामी केल्यानंतर या सर्वांना तिथे दाखल करण्यात आलं होतं.
या सर्वांना रुग्णालयातून सोडल्यानंतर जबाब नोंदवला जाणार आहे. पोलिसांकडून मशिदीतून २३६१ जणांना बाहेर काढण्यात आलेलं असून यामधील ६०६ जणांमध्ये करोनाची लक्षणं आढळली. कार्यक्रमाला हजर असणाऱ्यांपैकी शेकडो जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. पोलिसांना तपास करताना काळजी घेण्यास सांगण्यात आलं आहे. आदेश असतानाही लोकांना एकत्र करत गर्दी केल्याप्रकरणी आणि सोशल डिस्टन्सिंग न पाळल्याने मोहम्मद साद आणि तबलिगी जमातच्या इतर सदस्यांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

No comments

Powered by Blogger.