उद्धव ठाकरे समर्थक-विरोधकांमध्ये ट्विट ‘वॉर’

उद्धव ठाकरे समर्थक-विरोधकांमध्ये ट्विट ‘वॉर’
लॉकडाउन वाढवल्याच्या घोषणेनंतर मुंबईत मंगळवारी (१४ एप्रिल) सायंकाळी वांद्रे रेल्वे स्थानकाबाहेर हजारो कामगारांनी गर्दी केली होती. या गर्दीवरून महाविकास आघाडीविरूद्ध भाजपा असा राजकीय संघर्ष दिसून आला. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधक ट्विटरवर भिडले आहेत. या घटनेनंतर #UddhavResign आणि #WorldBestCM हे दोन हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ एप्रिल रोजी ३ मे पर्यंत लॉकडाउन वाढवत असल्याची घोषणा केली. त्यानंतर विविध ठिकाणी अडकलेल्या परराज्यातील कामगारांना घरी सोडण्यासाठी विशेष रेल्वे सोडण्यात येणार असल्याचं वृत्त व्हायरल झालं. यामुळे गोंधळाचं वातावरण निर्माण होऊन मुंबईतील वांद्रे रेल्वे स्थानकाबाहेर हजारो कामगारांनी गर्दी केल्याची घटना घडली. यावरून बरेच राजकीय वादविवाद झाले. पण, हा वाद संपण्याची चिन्ह दिसत नाहीत. या घटनेवरून आता ट्विट वॉर सुरू झालं आहे. ट्विटरवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे समर्थक आणि विरोधक आमनेसामने आले आहेत. विरोधक उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याची मागणी करणारा #UddhavResign ट्रेंड चालवला जात आहे. यात आदित्य ठाकरे यांच्यावरही टीका केली जात आहे.
तर दुसरीकडे उद्धव ठाकरे हेच चांगले मुख्यमंत्री (#WorldBestCM)असल्याचे ट्विट केले जात आहे. तसा ट्रेंड ट्विटरवर आहे.
देशातील आणि राज्यातील स्थिती अत्यंत चिंताजनक असताना सुरू झालेला हा वाद आणखी विकोपाला जातो की काय? असं प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. विशेषतः अशा प्रकारची टीका उद्धव ठाकरे यांच्यावर होत असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही ही राजकारण करण्याची वेळ नाही, असं सांगत हे थांबवण्याचं आवाहन केलं आहे.

No comments

Powered by Blogger.