“मजूर रस्ते आणि रेल्वे रुळांवरुन चालत प्रवास करणार नाहीत याची खबरादारी घ्यावी”; केंद्राचा राज्यांना आदेश

“मजूर रस्ते आणि रेल्वे रुळांवरुन चालत प्रवास करणार नाहीत याची खबरादारी घ्यावी”; केंद्राचा राज्यांना आदेश
केंद्र सरकारने करोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाउनची घोषणा केलेली असतानाच देशातील वेगवेगळ्या राज्यांमधील स्थलांतरित मजूर आपआपल्या राज्यांमध्ये परत जाताना दिसत आहे. सार्वजनिक वाहतूक सेवा बंद असल्याने अनेकांनी पायीच आपल्या राज्यात जाण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र याच पार्श्वभूमीवर आता केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्य सरकारांना महत्वाचे निर्देश दिले आहेत. मजूर आणि कमागारांना रस्त्यांवरुन तसेच रेल्वे ट्रॅक वरुन पायी आपल्या राज्यात जाण्यापासून थांबवावे असं गृह मंत्रालयाने पत्रक जारी करत स्पष्ट केलं आहे. राज्य सरकारच्या प्रयत्नानंतरही मजूर पायी जाण्याचा विचार करत असतील तर त्यांना विश्वासात घेऊन जवळच्या शेल्टर होममध्ये त्यांची राहण्याची आणि खाण्यापिण्याची सोय करावी असंही केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे. येत्या काळात आणखीन श्रमिक ट्रेन चालवल्या जाणार असून या ट्रेनसंदर्भात राज्य सरकारांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावे असंही केंद्राने म्हटलं आहे.
सर्व राज्यांच्या तसेच केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना यासंदर्भात केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी पत्र लिहिलं आहे. सर्व राज्यांच्या सचिवांनी स्थलांतरित मजुरांसाठी चालवण्यात येणाऱ्या आणि विशेष श्रमिक ट्रेन्ससाठी प्रशासनाने रेल्वेचे सहकार्य करावे असंही या पत्रामध्ये म्हटलं आहे. कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांच्याबरोबर रविवारी झालेल्या बैठकीचा उल्लेख करताना भल्ला यांनी प्रवासी कामगार रस्त्यांवरुन आणि लोहमार्गांवरुन चालत आपल्या राज्यांकडे जाताना झालेल्या गंभीर अपघातांची केंद्र सरकारने दखल घेतल्याचे म्हटले आहे.
“मजुरांना त्यांच्या घरापर्यंत घेऊन जाणारी बस सेवा आणि रेल्वे सेवा सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यांनी आणि केंद्रसाशित प्रदेशांनी कोणतेही स्थलांतरीत मजूर स्त्यांवरुन किंवा लोहमार्गांवरुन चालत आपल्या राज्यात जाण्याचा प्रयत्न करणार नाहीत याची दखल घ्यावी”, असं या पत्रामध्ये नमूद करण्यात आलं आहे. असे मजूर अढळल्यास त्यांना त्यांच्या राज्यात पोहचवण्याची बस किंवा रेल्वे सेवा सुरु होत नाही तोपर्यंत स्थानिक राज्य सरकारने त्यांची व्यवस्था करावी. जवळच्या शेल्टर होममध्ये त्यांच्या राहण्याची तसेच अन्नाची सोय करण्यात यावी, असं सचिवांनी या पत्रामध्ये नमूद केलं आहे.
हे सर्व मजूर लवकरात लवकर आपल्या राज्यांत पोहचावेत यासाठी केंद्र आणि रेल्वेमार्फत विशेष ट्रेन चालवण्या जाणार आहेत. त्यामुळेच राज्य सरकरांनी यांसदर्भात त्यांच्या स्तरावरील निर्णय तातडीने घेऊन रेल्वे प्रशासनाचा यासंदर्भात सहाय्य करावं असं आवाहनही केंद्रीय सचिवांनी केलं आहे. “कोणताही विरोध न करता श्रमिक विशेष ट्रेन्सला आपल्या राज्यांमधून मजुरांना त्यांच्या राज्यात घेऊन जाण्याची परवानगी द्यावी आणि या मजुरांना घरी पोहचण्यास मदत करावी असं मी सर्व राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना आवाहन करतो,” असं भल्ला यांनी पत्रकामध्ये म्हटलं आहे.

No comments

Powered by Blogger.