काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याविरोधात कर्नाटकमध्ये गुन्हा

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी
यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीएम केअर्स फंडविरोधात
संभ्रम पसरवल्याप्रकरणी कर्नाटकमधील एका वकिलाने सोनिया गांधी
यांच्याविरोधात पोलिसात तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी सोनिया
यांच्याविरोधात गुन्ह्याची नोंद केली.
पीएम केअर्स फंडाबाबत काँग्रेसच्या ट्विटर
हॅण्डलवरुन दिशाभूल करणारे ट्वीट केल्याचा आरोप वकील के व्ही प्रवीण यांनी
केला असून, कर्नाटकच्या शिवमोग्गामध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी
सोनिया गांधी यांच्याविरोधात भारतीय दंड विधान कलम 153 आणि 505 अंतर्गत
गुन्हा नोंदवला आहे.
कोरोना व्हायरसविरुद्धच्या लढाईसाठी
मदतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम केअर्स फंडची स्थापना केल्याची
घोषणा 28 मार्च रोजी केली होती. कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी पीएम
केअर्स फंडमध्ये जास्तीत जास्त योगदान करण्याचं आवाहन मोदींनी केलं. यानंतर
उद्योजकांपासून राजकारण्यांपर्यंत आणि खेळाडूं, कलाकारांपासून सामान्यांनी
या फंडमध्ये भरघोस मदत केली.
पीएम केअर्स फंडची स्थापना एक स्वतंत्र
पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट म्हणून करण्यात आली आहे. प्राईम मिनिस्टर सिटीझन
असिस्टन्स अॅण्ड रिलीफ इन इमर्जन्सी सिच्युएशन फंड (PM CARES Fund) असं या
फंडचं पूर्ण नाव आहे.
परंतु
या फंडच्या स्थापनेनंतर काँग्रेससह अनेकांनी त्यावर प्रश्न उपस्थित केले.
देशात पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधी असताना नव्या पीएम केअर्स फंडची
स्थापना करण्याची गरज काय असा सवाल विचारला जात आहे. काहींनी तर पीएम
केअर्स फंड हा घोटाळा असल्याचंही म्हटलं आहे. हा फंड कॅगच्या कक्षेबाहेर
असू शकतो, जेणेकरुन या फंडमधून केलेल्या खर्चावर तसंच वापरावर कोणाची नजर
नसेल, म्हणूनच त्याची स्थापना झाल्याचा अंदाज काहींनी व्यक्त केला आहे.
Post a Comment