चीनची दादागिरी रोखण्यासाठी लडाखमध्ये अतिरिक्त सैन्य तुकडया तैनात

सीमा भागात नेहमीच आपले वर्चस्व दाखवण्याचा चीनचा प्रयत्न असतो. त्याला उत्तर देण्यासाठी म्हणून लडाखमध्ये भारतीय सैन्याने अतिरिक्त तुकडया तैनात केल्या आहेत. सीमावाद कायम असलेल्या पूर्व लडाखच्या काही भागांमध्ये भारत आणि चीन दोघांनी अतिरिक्त सैन्य तुकडया तैनात केल्या आहेत. पाच-सहा मे रोजी पॅनगॉंग टीएसओ सेक्टरमध्ये भारत आणि चीनचे सैनिक परस्परांना भिडले होते. या पूर्वी सुद्धा या भागामध्ये दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये हिंसक चकमकी झाल्या आहेत. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.
डेमचॉक, चुमार, दौलत बेग ओल्डी आणि गालवान व्हॅली या भागामध्ये सैन्य तुकडया तैनात करण्यात आल्या आहेत. गालवान व्हॅली या भागातही आता चीनकडून आव्हान देण्यात येत आहे. गालवान नदीजवळ चिनी सैन्याने तंबू उभारुन बांधकाम सुरु केले होते. त्याला भारतीय सैन्याकडून आव्हान देण्यात आले असे भारतीय लष्करातील सूत्रांनी सांगितले.
पॅनगॉँग टीएसओ सेक्टरमध्ये पाच-सहा मे रोजी दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये हाणामारी झाली. त्यामध्ये दोन्ही बाजूचे सैनिक जखमी झाले. त्यामुळे तिथे अतिरिक्त तुकडया तैनात करण्यात आल्या आहेत. २०१३ साली एप्रिल-मे महिन्यात डीबीओ सेक्टरमध्ये भारत आणि चीनचे सैन्य समोरा-समोर आले होते. २१ दिवस दोन्ही देशांचे सैनिक परस्परासमोर उभे ठाकले होते. चीनने भारताच्या हद्दीत १९ किलोमीटर आतपर्यंत घुसखोरी केल्यामुळे त्यावेळी संघर्षाची स्थिती निर्माण झाली होती. २०१८ साली डेमचॉकमध्ये सुद्धा तंबू ठोकण्यासाठी चीनचे सैन्य ३०० ते ४०० मीटर आत आले होते. त्यावेळी सुद्धा भारतीय सैन्याने त्यांना आव्हान दिले होते.
Post a Comment