गुरुदक्षिणेतून विविध संस्थांना ‘लाख’मोलाची मदत

ज्येष्ठ कथक नृत्यगुरू पं. रोहिणी भाटे यांचा वारसा जोपासत नृत्यभारती कथक डान्स अॅकॅडमीच्या विविध शाखांतील शिष्यांनी गुरुदक्षिणेच्या माध्यमातून संकलित केलेल्या निधीतून विविध संस्थांना ‘लाख’मोलाची मदत करून सामाजित भान जपले.
अॅकॅडमीच्या विविध शाखांतील शिष्या दरवर्षी एकत्र येऊन स्वरचित नृत्यरचनेची गुरुदक्षिणा अर्पण करतात. करोनाच्या संकटामुळे गेली ७२ वर्षे अव्याहतपणे जपली जाणारी ही प्रथा एकत्रितपणे राबविण्यास मर्यादा आल्या आहेत. प्रथेत खंड न पाडता वेगळ्या स्वरूपात हा कार्यक्रम घेण्याचे संस्थेने योजिले आहे. दरवर्षीप्रमाणे गुरुदक्षिणेचा निधी जमा करून करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत अडचणीत आलेल्या विविध घटकांना मदत करणाऱ्या सामाजिक संस्थांना दिला. गुरु-शिष्य परंपरेतील चार पिढय़ांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेत एक लाखाहून अधिक रुपयांचा निधी संकलित केला. हा निधी ‘खाना बचाव, खाना खिलाओ’, ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती’, ‘ झाशीची राणी प्रतिष्ठान’ आणि ‘आय टीच स्कूल’ या सामाजिक संस्थांना सुपूर्द करण्यात आला. संस्थेच्या संचालिका नीलिमा अध्ये म्हणाल्या की, ही संकल्पना शिष्यांपुढे मांडल्यानंतर उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विशेष म्हणजे नवोदित आणि बाल नृत्यांगनांनी आपले खाऊचे पैसे या उपक्रमासाठी स्वखुशीने दिले. गुरू रोहिणीताई यांनी अनेकदा आपल्या कार्यातून सामाजिक दायित्वाचे दर्शन घडविले होते. त्यामुळे हा उपक्रम म्हणजे त्यांना विनम्र भावनेने अर्पण केलेली गुरुदक्षिणाच आहे.
Post a Comment