मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीच्या चौघांनी उमेदवारी अर्ज भरला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीच्या चौघांनी उमेदवारी अर्ज भरला
विधानपरिषद निवडणुकीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. शिवसेनेकडून उद्धव ठाकरे यांच्यासह विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी देखील अर्ज भरला. यावेळी राष्ट्रवादीकडून शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला. तर काँग्रेसचे उमेदवार राजेश राठोड हे दीड वाजता अर्ज भरणार आहेत. यावेळी महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते उपस्थित होते.  विधानपरिषदेच्या नऊ जागांसाठी नऊच अर्ज असल्याचं स्पष्ट झाल्यामुळं आता ही निवडणूक बिनविरोध होणार हे निश्चित झालं आहे.
यावेळी उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे मंत्री आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, मंत्री अनिल परब, मंत्री एकनाथ शिंदे, मिलिंद नार्वेकर, तेजस ठाकरे देखील उपस्थित होते.

राष्ट्रवादीकडून शशिकांत शिंदे, अमोल मिटकरींना संधी

साताऱ्याचे शशिकांत शिंदे आणि अकोल्याचे अमोल मिटकरी यांना राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे.  शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचा विधानसभा निवडणुकीत धक्कादायक पराभव झाला होता. दीर्घ अनुभव असल्याने त्यांना संधी दिली गेली असल्याचे बोलले जात आहे. तर अमोल मिटकरी यांच्यासारख्या नवख्या उमेदवाराला देखील राष्ट्रवादीने संधी दिली आहे. संभाजी ब्रिगेडमध्ये अनेक वर्ष प्रवक्ते म्हणून त्यांनी काम केलं आहे. विधानसभा निवडणुकीआधी त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. या दोघांनीही आज अर्ज भरले. यावेळी राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री जयंत पाटील उपस्थित होते.

भाजपकडून डॉ. गोपछडे, दटके, पडळकर , मोहिते पाटील यांनी भरले अर्ज

भाजपकडून विधानपरिषदेसाठी डॉ. अजित गोपछडे, प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब करण्यात आलं. त्यांनी 9 मे रोजी आपले उमेदवारी अर्जही भरले. भाजपकडून दिग्गजांना डावलत विधानपरिषद निवडणुकीत तीन ओबीसी आणि एक मराठा नेत्याला संधी देण्यात आली आहे. यामध्ये लिंगायत आणि धनगर समाजाला प्राधान्य देण्यात आलं आहे. नांदेडमधून डॉ. अजित गोपछेडे आणि नागपूरचे प्रवीण दटके ओबीसी आहेत, तर सांगलीतले गोपीचंद पडळकर धनगर नेते म्हणून ओळखले जातात. सोलापूर जिल्ह्यात वर्चस्व असलेले रणजितसिंह मोहिते पाटील मराठा नेता आहेत.

No comments

Powered by Blogger.