लडाखमध्ये नाजूक स्थिती, लष्करप्रमुखांनी पंतप्रधान मोदींना दिली कल्पना

लष्करप्रमुख जनरल एम.एम.नरवणे यांनी शुक्रवारी देशाच्या सर्वोच्च नेतृत्वाला लडाखमधील परिस्थितीची आणि भारतीय सैन्याच्या तयारीची माहिती दिली. युद्धजन्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी भारतीय सैन्य पूर्णपणे सज्ज आहे. चीनने कुठलीही आगळीक केल्यास चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय सैन्य पूर्णपणे तयार आहे.
पूर्व लडाखमधील नियंत्रण रेषेजवळील भागांना भेट देऊन आल्यानंतर लष्करप्रमुख नरवणे यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांना परिस्थितीची कल्पना दिली. त्यानंतर काल शुक्रवारी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.
भारताने आपल्या तयारीमध्ये कुठलीही कमतरता ठेवलेली नाही. बोफोर्स, हॉवित्झर तोफा, टी-९०, टी-७२ रणगाडे तैनात केले आहेत. इंडियन एअर फोर्सचे सुखोई-३० एमकेआय आणि मिग-२९ या फायटर विमानांची आकाशात नियमित गस्त सुरु आहे. सैन्य तुकडयांबरोबरच घातक शस्त्रास्त्र तयार आहेत. त्याशिवाय चिनूक, अपाची हेलिकॉप्टरच्या फेऱ्याही सुरु आहेत.
गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर परिस्थिती अधिक चिघळली आहे. चीन एकाबाजूला चर्चा करतोय पण दुसऱ्या बाजूला सैनिकांची संख्या सुद्धा वाढवतोय. या दुटप्पीभूमिकेमुळे कोंडी निर्माण झाली आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तणाव असल्याने पुन्हा गलवान सारखा संघर्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पँगाँग आणि गलवान खोऱ्यात हा तणाव जास्त आहे.

No comments

Powered by Blogger.