मुख्यमंत्री म्हणजे काही चित्रपटसृष्टीतील हिरो नाही - उद्धव ठाकरे

“मुख्यमंत्री म्हणजे काही चित्रपटसृष्टीतील हिरो नाही. माझं काम बोललं
पाहिजे आणि तेच महत्त्वाचं आहे,” असं मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी
व्यक्त केलं. महाराष्ट्राच्या हीरक महोत्सवानिमित्त ‘लोकसत्ता’च्या वतीने
आयोजित करण्यात आलेल्या ‘साठीचा गझल.. महाराष्ट्राचा’ या वेबसंवाद
कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहभागी झाले होते. उद्धव ठाकरेंच्या
मुलाखतीने या उपक्रमाची सांगता झाली. यावेळी ते बोलत होते.
“मुख्यमंत्री म्हणजे काही चित्रपटसृष्टीतील हिरो नाही. माझं काम बोललं
पाहिजे. ते दिसलं पाहिजे. हे महत्त्वाचं आहे. मी दिसलो नाही तरी चालेल,”
असं मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं. या मुलाखतीदरम्यान त्यांनी अनेक
विषयांवर भाष्य केलं. तसंच त्यांनी विरोधकांवरही निशाणा साधला. “जे
आमच्यावर आरोप करत आहेत त्यांनी इतर राज्यांनी काय केलं हे पाहावं. राज्य
सरकार गोंधळलेलं नाही. आपण मोजून मापून पाऊल टाकत आहोत. आपण मुंबईत तज्ज्ञ
डॉक्टरांचे टास्क फोर्स तयार केले, असं कोणत्या राज्यानं केलं? आपल्याकडे
व्हेंटिलेटर्सवर असलेले रुग्णही परत आले आहोत. करोनाच्या उपचारात औषधांचं
कॉम्बिनेशन आवश्यक आहे. अनुभव संपन्न असलेले लोक आज आरोप करत आहेत.
माझ्याकडे प्रशासनाचा अनुभव नसला तरी माझ्याकडे आत्मविश्वास आहे. मी बिलकुल
गोंधळलेलो नाही,” असं ते म्हणाले.
शाळा सुरू करणं सध्या अवघड
“सध्या शाळा सुरू करणं अवघड दिसत आहे. अनेक पर्यायांवर चर्चा सुरू आहे.
मुलांना ऑनलाइन शिक्षण देता येईल का?, किंवा शिक्षणासाठी मुलांना अधिकचा
डेटा देता येईल का? यासंदर्भातही मोबाईल कंपन्यांशीही चर्चा सुरू आहे किंवा
एखाद्या चॅनलवरून काही अभ्यास घेता येईल का? यावर विचार सुरू आहे. अनेक
तज्ज्ञांशीदेखील यासंदर्भात चर्चा सुरू आहे,” असं मुख्यमंत्री म्हणाले.
त्या ठिकाणी चाचणी होणं कठिण
“सुरूवातीला आम्ही एका रूपयात अनेक प्रकारची चाचणी करण्याची योजना सुरू
केली. ते सुरू असतानाचा करोनाचं संकट आलं. परंतु त्या ठिकाणी करोनाची चाचणी
होणं सध्या कठिण आहे. यापूर्वी आमच्याकडे टेस्ट किट आल्या होत्या. त्या
उघडण्यापूर्वी तो बोगस असल्याचं आपल्याला सांगण्यात आलं,” असंही त्यांनी
नमूद केलं.
Post a Comment