लॉकडाऊनसंदर्भात गृहमंत्री अमित शाहांची सर्व मुख्यमंत्र्यांशी फोनवरुन चर्चा


कोरोना  व्हायरसच्या संकटामुळं देशभरात लॉकडाऊन सुरु आहे. कोरोनामुळं घोषित केलेला चौथा लॉकडाऊन सध्या सुरु आहे. हा लॉकडाऊन संपण्यासाठी अवघे दोन दिवस बाकी आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत फोनवरुन चर्चा केली आहे. लॉकडाऊन संदर्भात राज्यांच्या भूमिका काय आहेत याबाबत यात चर्चा केल्याची माहिती आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी लॉकडाऊन वाढवला जावा की नको या विषयावर चर्चा केली. सोबतच कोरोना व्हायरसवर नियंत्रण आणण्यासाठी आणखी काय प्रभावी पावलं उचलली जाऊ शकतात, यावर मुख्यमंत्र्यांची मतं जाणूण घेतली.

लॉकडाऊनचा चौथा टप्पा 31 मे रोजी संपत असून केवळ दोन दिवस उरलेले असताना अजून पुढची भूमिका काय असेल याबाबत स्पष्टता नाही. यासंदर्भात गृहमंत्र्यांनी सर्व मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत कोरोनाच्या स्थितीवर विस्तारपूर्वक चर्चा केली. सोबतच पुढे काय करायचं यावर देखील सूचना त्यांनी मागवल्या आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार अधिकतर मुख्यमंत्र्यांनी पुढील निर्णय केंद्रानेच घ्यावा असं मत मांडलं आहे.

महत्त्वाचं म्हणजे आतापर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्याआधी दरवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा व्हायची. मात्र अमित शाह यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याची ही पहिलीच वेळ आहे. याआधी नरेंद्र मोदी यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये अमित शाह नेहमी हजर असायचे. आता पंतप्रधान मोदी यांची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा होण्याची शक्यता कमी मानली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गृहमंत्री अमित शाह यांना मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन पुढील रणनीती तयार करावी असं सांगितलं असल्याची माहिती आहे.

No comments

Powered by Blogger.