‘जेएनयू’मध्ये विद्यार्थ्यांवर हल्ला
१८ जखमी, ‘अभाविप’वर आरोप; गृहमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) रविवारी रात्री चेहरे झाकलेल्या लाठय़ा-काठय़ाधारी हल्लेखोरांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्यात अनेक विद्यार्थ्यांसह प्राध्यापक जखमी झाले. विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आयेषी घोष गंभीर जखमी झाली. या प्रकरणी गृहमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले.
या हल्ल्यात विद्यार्थी आणि प्राध्यापकांसह किमान १८जण जखमी झाले आहेत. त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हल्ल्यामागे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा (अभाविप) हात असल्याचा आरोप जेएनयू विद्यार्थी संघटनेने केला आहे. ‘अभाविप’ने मात्र त्याचा इन्कार केला आहे.
मनुष्यबळ विकास मंत्रालयाने या हल्ल्याबाबत विद्यापीठाचे निबंधक प्रमोद कुमार यांच्याकडून तातडीने अहवाल मागवला आहे. देशभरातील बुद्धिवंत, विविध क्षेत्रातील मान्यवर आणि विरोधी पक्षांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. हल्ल्यामागे केंद्रातील सत्ताधारी भाजपचा हात असल्याचा आरोप आप’सह अनेक विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केला आहे.
जेएनयू शिक्षक संघटनेने आयोजित केलेल्या जाहीर शांतता सभेत काहीजण लाठय़ा-काढय़ा घेऊन घुसले. त्यांनी जेएनयू विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आयुषी हिच्यासह अनेक विद्यार्थ्यांवर हल्ला केला. दगडफेकही करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. या हल्ल्यात आयेषीसह अनेक विद्यार्थी आणि प्राध्यापक गंभीर जखमी झाले आहेत. बहुतेकांच्या डोक्याला गंभीर जखमा झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
Post a Comment