उत्तर प्रदेशमधील भीषण अपघातात 20 जणांचा मृत्यू, बस आणि ट्रक जळून खाक
उत्तर प्रदेशच्या कानौजमध्ये शुक्रवारी रात्री बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला या अपघातानंतर बस आणि ट्रकला आग लागली. या आगीत दोन्ही गाड्या जळून खाक झाल्या. या अपघातात 20 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर 21 जण गंभीर जखमी झाले आहेत.
प्रवासी बस कन्नोजच्या गुरसहायगंज येथून जयपूरला जात होती. मात्र, कानौजच्या जीटी रोडवर हा अपघात झाला.
या घटनेची माहिती मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे. याबाबत त्यांनी ट्विट केले असून अपघातातील जखमी प्रवाशांची प्रकृती लवकर बरी व्हावी, अशी प्रार्थना करतो, असे नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.
दरम्यान, उत्तर प्रदेश सरकारने मृत्यू प्रवाशांच्या कुटुंबियांना 2 लाख रुपये मदतीची घोषणा केली आहे. याशिवाय जखमींना देखील 50 हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे.
कानौजचे जिल्हाधिकारी रविंद्र कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, बसमध्ये 43 प्रवासी होते. यापैकी 26 प्रवासी हे गुरसहायगंज येथून तर 17 प्रवासी हे छिबरामऊ येथून बसले होते.
Post a Comment