राज्यसभेसाठी राष्ट्रवादीकडून शरद पवारांसह ‘यांचं’ नाव

येत्या २६ मार्च रोजी राज्यसभेच्या महाराष्ट्राच्या सात जागा रिक्त होणार आहेत. त्यापैकी २ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि माजी मंत्री फौजीया खान यांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. शरद पवार यांचा राज्यसभेचा कार्यकाळ एप्रिल महिन्यात पूर्ण होणार आहे. तर राज्यसभेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य माजिद मेमन यांचा कार्यकाळही पूर्ण होणार आहे. यावेळी त्यांच्या जागी फौजिया खान यांना संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यसभेच्या महाराष्ट्राच्या सात जागा रिक्त होणार आहेत. यापैकी चार महाविकास आघाडीच्या आहेत. त्यापैकी २ राष्ट्रवादी काँग्रेस, एक काँग्रेस आणि एक जागा शिवसेनेची आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं आपली दोन नावं निश्चित केली आहेत. परंतु काँग्रेस आणि शिवसेनेनं मात्र नावांची घोषणा केली नाही. पहिल्यांदाच शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित निवडणूक लढवणार आहेत.
भाजपाच्या रिक्त होणाऱ्या दोन जागांपैकी एका जागेसाठी रामदास आठवले यांचं नाव निश्चित मानलं जात आहे. तर दुसऱ्या जागेसाठी विद्यमान खासदार संजय काकडेच प्रयत्नशील असल्याची महिती समोर आली आहे. त्यांचा कार्यकाळही पूर्ण होणार असल्यानं त्यांची जागा रिक्त होणार आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा देऊन भाजपामध्ये प्रवेश केलेल्या उदयनराजे भोसले यांच्या नावाचीदेखील चर्चा आहे. परंतु संजय काकडे यांनी उदयनराजे भोसले यांच्या नावाला विरोध केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे भाजपा कोणाला उमेदवारी देणार हे पहावं लागणार आहे. साताऱ्यात झालेल्या पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले हे भाजपाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.

No comments

Powered by Blogger.