मुख्यमंत्रीपद माझं हे स्वप्न कधीच नव्हतं :उद्धव ठाकरे
मुख्यमंत्रीपद माझं हे स्वप्न कधीच नव्हतं ...उद्धव ठाकरे
मुख्यमंत्रिपदाबाबत ते म्हणाले की,' वचन देणं आणि वचन निभावणं यात फरक आहे. वचनभंग झाल्यावर साहजिकच दुःख आहे, रागही आहे. ‘त्यांनी’ कशासाठी हे केलं? का वचन दिलं आणि का वचन मोडलं? मग त्यांनी अशा पद्धतीने वचन मोडल्यानंतर माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. त्यांनी वचन पाळलं असतं तर काय झालं असतं! असं काय मी मोठं मागितलं होतं; आकाशातले चांद-तारे मागितले होते की काय मागितलं होतं! मी तर लोकसभा निवडणुकीच्या आधी आमच्या वाटाघाटी झाल्या तेव्हा जे आमच्यात ठरलं होतं तेवढंच मागितलं होतं.'
दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्याचे वचन दिले होते. त्या वचनपूर्ततेसाठी मी कोणत्याही थराला जायचं ठरवलं होतं. माझं मुख्यमंत्रीपद ही वचनपूर्ती नाही, तर वचनपूर्तीच्या दिशेने टाकलेलं ते एक पाऊल आहे. मुख्यमंत्रीपद स्वीकारणं हा माझ्यासाठी धक्का नसला तरी माझं हे स्वप्न कधीच नव्हतं, असा खुलासा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला. राज्यसभा सदस्य तथा शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'चे संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांची मुलाखत घेतली. त्यात ते बोलत होते. आपल्या मुलाखतीत त्यांनी अनेक मुद्द्यांवर स्पष्टपणे आपली मते मांडली. शिवसेनाप्रमुखांचा शिवसैनिक मुख्यमंत्री पदावर बसवणार हे माझं वचन आहे आणि त्या दिशेने टाकलेलं हे पहिलं पाऊल आहे, असं मी मानतो, असेही त्यांनी यावेळी म्हटले.
शिवसेनाप्रमुखांनी आयुष्यात कधी सत्तेचं कोणतंही पद स्वीकारलं नाही. माझीही तशी इच्छा नव्हती, अजिबात नव्हती. पण जेव्हा माझ्या लक्षात आलं की, ज्यांच्यासोबत आपण आहोत किंवा होतो त्यांच्यासोबत राहून मी माझ्या वचनपूर्तीच्या दिशेनं जाऊ शकत नाही आणि त्या वचनपूर्तीसाठी वेगळी दिशा जर मला स्वीकारायची असेल तर तशी तयारी असायला हवी. माझा नाइलाज होता. ती जबाबदारी स्वीकारावीच लागली. मी प्रामाणिकपणे सांगतो की, सत्तेची खुर्ची ही माझ्यासाठी नवीन असली तरी सत्ता माझ्यासाठी नवीन नाही. शिवसेनाप्रमुखांनी जी सत्ता किंवा हुकुमत गाजवली ती मी जवळून बघितली आहे. मुख्य म्हणजे, त्यांनी ती जनकल्याणासाठी राबवली. त्यामुळे मला हे नवीन नाही.
Post a Comment