एक रुपयात ‘जनतेच्या दारात’ आरोग्य चाचणी!

Image result for health checkup
एक रुपयात ‘जनतेच्या दारात’ आरोग्य चाचणी!
दहा रुपयांमध्ये ‘शिवभोजन थाळी’ योजना लागू करून महाविकास आघाडीतील शिवसेनेने आपल्या वचननाम्यातील एका वचनाची पूर्ती केली. त्याचप्रमाणे १ रुपयामध्ये आरोग्य चाचणी करण्याची योजनाही आता अंतिम टप्प्यात आली आहे. ‘एक रुपयात जनतेच्या दारात आरोग्य चाचणी’ अशी संकल्पना यामागे असून लवकरच त्याची घोषणा करण्यात येणार असल्याचे शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्याने सांगितले.

महाविकास आघाडीने समान कार्यक्रम जाहीर केला असला तरी शिवसेनेनेही स्वतंत्र वचननामा जाहीर केला आहे. त्यानुसार शिवभोजन थाळीपाठोपाठ आता एक रुपयात आरोग्य चाचणीची संकल्पना तयार करण्यात आली आहे. सुरुवातीला मधुमेहासह १० ते १५ चाचण्या करण्यात येणार आहेत. या चाचण्या  जनतेच्या दारात म्हणजे तहसीलदार कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, बस स्थानक तसेच रेल्वे स्थानक परिसरात करण्याचे प्रस्तावित आहे.
शालेय स्तरावर या चाचण्या कशा करता येतील याचाही विचार सुरू आहे. तालुका पातळीवर तसेच जिल्हा पातळीवर मोठय़ा प्रमाणात लोक शासकीय कार्यालयात येत असतात व त्या ठिकाणी बऱ्यापैकी मोकळा वेळ लोकांकडे असतो हे लक्षात घेऊन एक रुपयातील चाचण्या करण्याची संकल्पना तयार करण्यात आली आहे. शिवभोजन थाळी १० रुपयात देताना शासनाकडून प्रतिथाळीमागे ३० रुपये केंद्र चालकांना दिले जातात. त्याचप्रमाणे या आरोग्य चाचण्यांची व्यवस्था केली जाणार आहे. मात्र यात सामाजिक संस्थांच्या माध्यमातून या चाचण्या करायच्या की चाचण्या करणाऱ्या एखाद्या कंपनीलाच थेट काम सोपवायचे यावर विचार सुरू असल्याचेही सेना नेत्याने सांगितले.
आरोग्य विभागाच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये तसेच जिल्हा रुग्णालयात आजघडीला रक्त चाचण्यांसह वेगवेगळ्या चाचण्या मोफत केल्या जातात. या चाचण्या दोन पद्धतीने केल्या जात असून आरोग्य विभागाकडून काही चाचण्या केल्या जातात तर काही चाचण्या या ‘एचएलएल’ कंपनीच्या माध्यमातून करण्यात येतात. आरोग्य विभागाची राज्यात सुमारे ५०० रुग्णालये व १८२८ प्राथमिक आरोग्य केंद्र असून या ठिकाणी वर्षभरात बाह्य़ रुग्णविभागात सुमारे ८ कोटी रुग्णांची वर्षांकाठी तपासणी होते तर ४८ लाख रुग्णांवर उपचार केले जातात. आरोग्य विभागाच्या सर्व रुग्णालयांमध्ये  ५ लाख छोटय़ा व मोठय़ा शस्त्रक्रिया केल्या जातात. यासाठी ३५ हजार चाचण्या  ‘एचएलएल’ कंपनीच्या माध्यमातून तर ३५ हजार चाचण्या आरोग्य विभागाच्या प्रयोगशाळांतून केल्या जातात. ‘एचएलएल’ला या चाचण्या करण्यासाठी वर्षांकाठी सुमारे २५० कोटी रुपये द्यावे लागत असून या साऱ्याचा आढावा घेऊन ‘जनतेच्या दारात’ आरोग्य चाचण्या कशा प्रकारे करता येतील याचे काम अंतिम टप्प्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

No comments

Powered by Blogger.