वारंवार सूचना देऊनही बंद ठेवणाऱ्या नर्सिंग होमचे परवाने रद्द होणार

वारंवार सूचना देऊनही बंद ठेवणाऱ्या नर्सिंग होमचे परवाने रद्द होणार
कोराना व्यतिरिक्त इतर आजारांवरील उपचारांसाठी खासगी नर्सिंग होम आणि दवाखाने सुरु ठेवण्याचे आदेश देऊनही अनेक ठिकाणी या सेवा सुरु झालेल्या नाहीत. परिणामी नॉन कोविड रुग्णांना वैद्यकीय उपचार मिळण्यात अडथळे येत आहेत. त्यामुळे जे नर्सिंग होम अद्याप सुरु झालेले नाहीत त्यांचे परवाने रद्द करण्याचे आदेश मुंबई महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. तसंच बंद असणाऱ्या खाजगी दवाखान्यांबाबत 'एपिडेमिक ॲक्ट 1897' (साथरोग कायदा 1897) नुसार कारवाई करण्याचे निर्देशही महापालिका आयुक्तांनी सार्वजनिक आरोग्य खात्याला दिले आहेत.
जे नर्सिंग होम किंवा दवाखाने सोसायटी परिसरात, चाळीमध्ये, भाड्याच्या जागेत किंवा तत्सम ठिकाणी असून ते उघडण्यास सोसायटीतील व्यक्ती, मालक, शेजारी यांच्याद्वारे अडथळा आणला जात असल्यास; किंवा दवाखाने बंद ठेवण्यासाठी दबाव आणला जात असल्यास त्यांच्यावर 'एपिडेमिक ॲक्ट 1897' नुसार अत्यावश्यक सेवेत अडथळा आणल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्याचे तसंच गुन्हे दाखल करण्याचे संकेत महापालिका प्रशासनाने दिले आहेत.

यासाठी, महापालिकेच्या सर्व 24 विभागातील सार्वजनिक आरोग्य खात्याचे वैद्यकीय अधिकारी (M.O.H.) आपापल्या कार्यक्षेत्राचे सर्वेक्षण करतील. या सर्वेक्षणादरम्यान जे नर्सिंग होम बंद असल्याचे आढळून येतील, त्यांचे परवाने रद्द करण्याची कार्यवाही सुरु केली जाईल. तर जे खाजगी दवाखाने बंद आढळून येतील, त्यांच्याबाबत माहिती घेऊन संबंधित डॉक्टर किंवा दवाखाना उघडण्यात अडथळा आणणाऱ्यांवर 'एपिडेमिक ॲक्ट 1897' नुसार कारवाई सुरु करावी, असे आदेश कार्यकारी आरोग्य अधिकारी यांच्याद्वारे विभागस्तरीय वैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

खाजगी नर्सिंग होम, खाजगी दवाखाने यांना दिलेल्या मार्गदर्शक सूचना -

- दवाखान्यात येणाऱ्या व्यक्तीच्या शरीराचे तापमान हे 'विना स्पर्श' (Non Contact Temperature) पद्धतीने तपासावे. संबंधित व्यक्तीच्या शरीराचे तापमान 98.6 फॅरेनहाईट किंवा त्यापेक्षा अधिक असल्यास अशा व्यक्तींना तात्काळ महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये किंवा फिव्हर क्लिनिकमध्ये पाठवावे.

- एखाद्या व्यक्तीची लक्षणे ही 'कोरोना कोविड 19' सारखी असल्यास अशा व्यक्तींना महापालिकेने निर्देशित केलेल्या केंद्रांवर पाठवावे.

- खासगी दवाखान्यांमध्ये 'नॉन कोविड' रुग्णांवर उपचार करण्यात यावेत. यामध्ये प्रामुख्याने मधुमेह, रक्तदाब, दमा यासारखे विकार असणाऱ्या रुग्णांवर उपचार करण्यात यावेत. तसेच संबंधित व्यक्तीने त्यांना सांगितलेले औषधोपचार योग्यप्रकारे घेत असल्याची खातरजमा करावी.

- रुग्णांना तपासताना 'आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय' यांच्याद्वारे जारी करण्यात आलेल्या सूचनांचे परिपूर्ण पालन करावे. यामध्ये प्रामुख्याने मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंग, हातांची स्वच्छता राखणे यासारख्या बाबींचा समावेश आहे.

No comments

Powered by Blogger.