भारताच्या चिनी अ‍ॅप्सवरील बंदीला अमेरिकेचं समर्थन

भारतानं राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव ५९ चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. या बंदीला अमेरिकेनंही समर्थन दिलं आहे. या बंदीमुळे भारताचं सार्वभौमत्व आणि सुरक्षेला चालना मिळणार असल्याचं मत अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पिओ यांनी व्यक्त केलं. “चीनमधील कम्युनिस्ट पक्षासाठी सहाय्यक म्हणून काम करणाऱ्या या अ‍ॅपवर भारतानं घातलेल्या बंदीचं आम्ही स्वागत करतो. भारताच्या दृष्टीकोनातून या निर्णामुळे सार्वभौमत्वाचं रक्षण होईल,” असं त्यांनी एका पत्रकार परिषदेदरम्यान म्हटलं.
दुसरीकडे, भारताच्या या निर्णयानंतर अमेरिकेच्या काही खासदारांनी शॉर्ट व्हिडीओ शेअरिंग अ‍ॅप्सला देशाच्या सुरक्षेसाठी मोठा धोका असल्याचं म्हणत भारतासारखंच पाऊल उचलण्याचं आवाहन केलं आहे. रिपब्लिकन सिनेटचे सदस्य जॉन कॉर्निन यांनी ‘द वॉशिंग्टन पोस्ट’मध्ये प्रकाशित झालेल्या एका वृत्ताला टॅग केलं आहे. “हिंसक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारताने टिकटॉक आणि इतर डझनभर इतर अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे,” असंही त्यांनी यासोबत म्हटलं आहे.
रिपब्लिकन रिक क्रॉफर्ड यांनी ट्विट करत टिकटॉकला अवश्य जायलाच पाहिजे असंही म्हटलं आहे. “चीन सरकार स्वत:च्या उद्दिष्टांसाठी टिकटॉकचा वापर करत आहे. अमेरिकन कॉंग्रेसमध्ये अशी किमान दोन विधेयकं सध्या प्रलंबित आहेत, त्यामध्ये सरकारच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या फोनवर टिकटॉक वापरण्यास बंदी घालण्याचं म्हटलं आहे,” असं गेल्या आठवड्यात अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओब्रायन यांनी असं म्हटलं होतं.
भारत सरकारनं सोमवारी चीनशी संबंधित ५९ अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या टिकटॉक आणि युसी ब्राऊझरसारख्या अ‍ॅपचाही समावेश होता. पूर्व लडाखमधअये चीनच्या सैनिकांसोबत भारतीय जवानांच्या झालेल्या चकमकीनंतर या अॅपवर भारतात बंदी घालण्यात आली होती.

No comments

Powered by Blogger.