TikTok ला भारतीय पर्याय असलेल्या ‘चिंगारी’ची वेबसाइट हॅक? युजर्सचा डेटा सेफ असल्याची कंपनीची माहिती

भारत सरकारने 59 चिनी अ‍ॅप्स बॅन केले आहेत. यामध्ये लोकप्रिय शॉर्ट व्हिडिओ मेकिंग प्लॅटफॉर्म टिकटॉकचाही समावेश आहे. टिकटॉकवर बंदी आल्यामुळे याचा चांगलाच फायदा चिंगारी या मेड इन इंडिया अ‍ॅपला झाला असून या अ‍ॅपची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच चिंगारी अ‍ॅपच्या वेबसाइटमध्ये हॅकर्सनी काही बदल केल्याची माहिती येत आहे. चिंगारी अ‍ॅप ऑपरेट करणारी कंपनी Globussoft च्या वेबसाइटच्या कोड्समध्ये काही बदल झाल्याचं समोर आलं आहे.
कंपनीच्या वेबसाइटवरील सर्व पेजेसमध्ये एक स्क्रिप्ट अ‍ॅड करण्यात आली होती, त्यात धोकादायक कोड होता. याद्वारे युजर्सना वेगवेगळ्या वेबसाइट्सवर रिडायरेक्ट करता येतं. Globussoft च्या वेबसाइटमधील या समस्येची माहिती सर्वप्रथम सिक्युरिटी रिसर्चर एलियट एल्डरसनने दिली आहे. यानंतर चिंगारी अ‍ॅपचे को-फाउंडर सुमित घोष यांनी लगेच यावर स्पष्टीकरण दिलं. आरोग्य सेतू अ‍ॅपमधील प्रायव्हसी त्रुटींबाबतची माहितीही एलियट एल्डरसनने दिली होती.
“आमचं अ‍ॅप Globussoft चा भाग असलं तरी अ‍ॅपला काहीही नुकसान झालेलं नाही. wp मधील त्रुटीबाबत माहिती दिल्याबद्दल धन्यवाद…चिंगारी अ‍ॅप किंवा वेबसाइट पूर्णपणे सुरक्षित आहे. आमच्या युजर्सवर याचा परिणाम होणार नाही. लवकरच wp मधील त्रुटी दूर करु” अशी माहिती घोष यांनी दिली. तसंच, ‘Globussoft वेबसाइट आणि चिंगारी अ‍ॅप दोघांच्या सिक्युरिटी टीम वेगळ्या आहेत, त्यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. चिंगारी लवकरच स्वतंत्र कंपनी बनेल, असंही घोष यांनी सांगितलं.
काय आहे चिंगारी अ‍ॅप :-
चिंगारी अ‍ॅप नोव्हेंबर 2018 मध्ये गुगल प्ले स्टोअरवर अधिकृतपणे आलं होतं. पण काही दिवसांपासून भारतात चिनी सामानांचा बहिष्कार करण्याची मागणी जोर धरु लागल्यानंतर चिंगारीच्या डाउनलोडिंगमध्ये मोठी वाढ झाली आहे. ओडिशाच्या विश्वात्मा नायक आणि कर्नाटकच्या सिद्धार्थ गौतम यांनी हे अ‍ॅप डेव्हलप केलं आहे.  भारतात तयार केलेलं हे अ‍ॅप TikTok ला थेट टक्कर देतंय. चिंगारी अ‍ॅपद्वारे तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बनवू शकतात आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअरही करु शकतात. अ‍ॅपमध्ये शानदार फीचर्स असून भारतीय भाषांचा सपोर्टही आहे. याशिवाय अ‍ॅपमध्ये ट्रेंडिंग न्यूज, एंटरटेनमेंट न्यूज, फनी व्हिडिओ, लव स्टेटस, व्हिडिओ साँग असे अनेक फीचर्स आहेत. चिंगारीवर शेअर केलेल्या पोस्टवर लाइक, कॉमेंट, शेअर करता येतील. व्हॉट्सअपवर शेअर करण्यासाठी वेगळा पर्याय आहे. एखाद्या युजरला फॉलो करण्याचाही पर्याय यामध्ये देण्यात आला आहे.

No comments

Powered by Blogger.