संधिवात आणि मांसाहार

सामान्यत:  संधिवात म्हटला जातो तो सांध्यांना सूज येणे, ताठरता येणे आणि वेदना. आयुर्वेदात संधिवाताचे विस्तृत वर्णन केले असून वाताच्या व्याधींमध्ये अनेक प्रकार, त्यांची लक्षणे नमूद केली आहेत. संधिवातात आहाराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे या आजारात पथ्याला अधिक महत्त्व आहे.

संधिवात आणि मांसाहार
संधिवातामध्ये मांसाहार करताना वाळवलेले मासे घालून केलेली भाजी खाऊ नये. कोरडे मांस, साठवलेले मासे, साठवलेले मांस संधिवात असणाऱ्यांनी सेवन न करणे फायदेशीरच असते. संधिवाताच्या रुग्णांनी स्थूल असल्यास म्हशीच्या दुधाचे सेवन करू नये, तसेच दुधाचे नासवलेले पदार्थही खाऊ नयेत. पनीर, खवा, पेढा कृश व्यक्तींनी खूप भूक लागली असले तरच खावेत अन्यथा टाळावे.
मध हा पदार्थ कफ, मेद कमी करणारा असला तरी वात वाढवणारा आहे. मध हा शरीरामध्ये कोरडेपणा निर्माण करणारा आहे. त्यामुळे संधिवातात मधाचे सेवन करू नये. मधाचा वापर मात्र संधिवाताच्या रुग्णांना बस्ती देण्यासाठी वापरायला हरकत नाही. हिरवी मिरची, लाल तिखटाचे पदार्थ संधिवातात टाळावेत. अनैसर्गिक रंग घालून केलेले ‘रंगीत दिसणारे’ पदार्थ संधिवाताच्या रुग्णांनी न खाणेच उत्तम.
संधिवातामध्ये सगळ्या पालेभाज्या तशा त्रासदायक आहेत, परंतु लसून आणि आले, कोथिंबीर किंवा लसणाची पात घालून केलेली भाजी (मेथी, पालक सोडून) सेवन करायला हरकत नाही. संधिवातामध्ये फळभाज्या अधिक फायदेशीर आहेत. त्यात शेवगा, सुरण,पडवळ (चणे किंवा तूर डाळ यात नसावी) तांदुळका, लालमाठ, वांगी या भाज्या खाव्यात. यात शेंगदाण्याऐवजी तीळ कूट वापरावे. लसूण आणि खोबरं जास्त घातल्यास चांगला फायदा होतो. खुरासणीची भाजी, चटणी, सरसू हे संधिवातात आरोग्यदायी आहे. पुनर्नवा या वनस्पतीची भाजी, केळफूल उत्तम कार्य करते. बीट, गाजर, जुना कांदा, ओव्याची पाने, ओवा यांपैकी एखादा पदार्थ रोजच्या आहारात घ्यावा. संधिवातात तांदूळ खावा हा गैरसमज आहे. तांदळाने वात वाढतो. स्थूल असल्यास तांदूळ भाजून घ्यावा. स्थूल व्यक्तींनी तांदूळ शिजवताना त्यामध्ये तूप टाकावे, तसेच यात ओव्याची, लसुणाची पाने घातल्यास स्वादही बदलतो आणि औषधी भात होतो. थंड पदार्थ टाळावेत तसेच थंड जेवणही खाऊ नये. संधिवातात थंड हवेत झोपू नये. पंख्याखाली झोपणे शक्यतो टाळावे. अंघोळीच्या पाण्यात कडुनिंबाची, निर्गुडीची पाने घालून स्नान केल्यास बराच आराम पडतो. या रुग्णांनी दिवसा मध्ये ५-६ वेळा पाणी पिण्याअगोदर किंचित ओवा घ्यावा.\

काय खाऊ नये?
सर्व प्रकारचे तुरट पदार्थ संधिवाताची लक्षणे वाढवतात. त्यामुळे सुपारीचे व्यसन असणाऱ्यांनी संधिवात असल्यास व्यसन सोडणे आवश्यक आहे. काही स्त्रिया भाजकी माती खातात. ही माती भाजकी असली तरी संधिवात वाढवते. मीठ जास्त असलेले पदार्थ टाळावेत. विशेष करून डबाबंद पदार्थ वज्र्य करावेत. वेफर्स, आकर्षक पाकिटातील कुरकुरीत पदार्थ यांच्यासह डब्यातील द्रव पदार्थ, शीतपेय, ‘रेडी टू इट’ तयार पिठे, तयार भाज्या यांचे सेवन संधिवाताची लक्षणे वाढवताना दिसून येतात. फळांमध्ये जांभळासारखी फळे, तसेच ताडगोळे संधिवात वाढवतात. रताळी, साबुदाणा, साबुदाण्याचे तळलेले पदार्थ, बटाटय़ाचे, मैद्याचे तळलेले पदार्थ संधिवात वाढवतात. अळूचे कंद वा अळूच्या पानांची वडी खाणे शक्यतो टाळावे. कामलकंद हा पदार्थ इतर व्याधींमध्ये पथ्यकर असला तरी संधिवातामध्ये अपथ्यकर आहे. न्याहारीमध्ये पोहे वा पराठे संधिवातात खाऊ  नयेत. चन्याच्या डाळीच्या पिठाचे म्हणजे बेसनाचे पदार्थ संधिवातात टाळावे. विशेषत: थंडीच्या ऋतूत हे पथ्य कठोर पाळावीत. संधिवाताच्या रुग्णांनी थंड पाणी टाळावे. थंड वातावरणामुळे पाणी अधिक थंड असल्यास या रुग्णांना कोमट पाणी प्यावे.

No comments

Powered by Blogger.