मुंबईतील नाईट लाईफला राज्य मंत्रीमंडळाने मंजुरी

मुंबईतील नाईट लाईफला राज्य मंत्रीमंडळाने मंजुरी
मुंबईतील नाईट लाईफला राज्य मंत्रीमंडळाने मंजुरी दिली असून 26 जानेवारीपासून अंमलबजावणीला सुरुवात होईल, अशी माहिती राज्याचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली. मंत्रीमंडळ बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे बोलत होते. नाईट लाईफ सुरु होत असली तर मुंबई पोलिसांवरील ताण वाढणार नाही, असा दावाही आदित्य ठाकरे यांनी केला.

मुंबईत प्रायोगिक तत्वावर नाईट लाईफ सुरु करण्याचा निर्णय आदित्य ठाकरेंनी घेतला आहे. त्यानुसार मुंबईत अनिवासी भागातील सर्व थिएटर, मॉल्स, रेस्टॉरंटस् 24 तास खुले ठेवण्यास परवानगी दिली जाणार आहे. नरिमन पॉईंट, काला घोडा, बीकेसी, कमला मिल अशा मुंबईतील अनिवासी भागात नाईट लाईफ सुरु होणार आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले की, "राज्य मंत्रीमंडळाने मुंबईतील नाईट लाईफला मंजुरी दिली आहे. त्यामुळे 26 जानेवारीपासून मुंबईतील हॉटेल, मॉल्स 24 तास सुरु राहणार आहेत. मात्र पब आणि बारसाठी नवे नियम नाहीत, त्यांच्यासाठी पूर्वीप्रमाणेच दीड वाजेपर्यंतची मर्यादा कायम राहणार आहे." तसंच नाईट लाईफमुळे मुंबई पोलिसांवरील ताण वाढणार नाही, असा दावाही आदित्य यांनी केला. नाईट लाईफमुळे अनेकांना रोजगार उपलब्ध होईल, असंही आदित्य ठाकरांनी सांगितलं.

"मुंबई 24 तास धावते. इथे नाईट शिफ्ट करणारे लोक आहेत. पण रात्री दहानंतर भूक लागली तर जायचं कुठे? शॉपिंग करु शकत नाही, पिक्चर पाहू शकत नाहीत. इथे पुरुष आणि महिला सुरक्षित फिरतात, पर्यटक येतात. मुंबईचा महसूल वाढवायचा असेल तर हे होणं गरजेचं आहे, नाईट लाईफच्या अंमलबजावणीनंतर थिएटर, दुकानं 24 तास सुरु राहणार. तसंची सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येतील. काही दुकानं सहा दिवस तर काही पाच दिवस, तर काही 18 तास खुली राहू शकतात. टॅक्सी, बस हळूहळू सुरु राहतीलस," असं आदित्य ठाकरे म्हणाले.

मुंबईप्रमाणे पुण्यातही नाईटलाईफ सुरु करणार का? या प्रश्नावर आदित्य ठाकरे यांच्या उत्तराने एकच हशा पिकला. पुण्यात आधी आफ्टरनून लाईफ सुरु करतोय आपण, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

No comments

Powered by Blogger.