ट्रान्सजेंडर ही त्यांची खासगी मालमत्ता असल्यासारखे काही लोक वागतात - गंगा म्हणाली

ट्रान्सजेंडर ही त्यांची खासगी मालमत्ता असल्यासारखे काही लोक वागतात - गंगा म्हणाली
झी युवा वाहिनीवरील ‘युवा डान्सिंग क्वीन’च्या निमित्ताने सध्या गंगा हे नाव भरपूर चर्चेत आहे. या कार्यक्रमात सूत्रसंचालनात अद्वैतला साथ देणारी गंगा ट्रान्सजेंडर असून मराठी मालिका विश्वात पहिल्यांदा एका ट्रान्सजेंडर व्यक्तीला सूत्रसंचालनाची संधी मिळाली आहे. गंगाचं खरं नाव प्रणित हाटे आहे. गंगा आज महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली आहे. मात्र प्रणितपासून गंगापर्यंतचा तिचा प्रवास काही सोपा नव्हता. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत गंगाने तिच्यासोबत घडलेला एक धक्कादायक अनुभव सांगितला.

गंगा म्हणाली, “मी ट्रान्सजेंडर असल्याने अनेकदा लोक मला गृहीत धरतात असं वाटतं. मी एकदा रात्री ११ वाजता एका रेल्वे स्टेशनवर शूटिंग करत होते. माझे दिग्दर्शकसुद्धा माझ्यासोबत होते. गर्दी नसलेल्या रेल्वे स्टेशनचं शूटिंग करायचं होतं म्हणून आम्ही रात्रीची वेळ निवडली होती. त्यावेळी दिग्दर्शकाच्या मागे उभा राहिलेल्या एका व्यक्तीने अचानक त्याच्या पँटची चेन उघडली आणि अश्लील हातवारे केले. माझ्यासाठी तो फार धक्कादायक प्रसंग होता. अशाप्रकारे वागायचं धाडस लोकांमध्ये कुठून येतं हेच कळत नाही. लोक कुठल्याही थराला जाऊ शकतात हे मला त्यावेळी वाटलं होतं. मी जर मुलगी असते तर कदाचित तो व्यक्ती तशाप्रकारे वागला नसता. मुलीविरोधात काही करण्यासाठी एखादवेळी लोक दोनदा विचार करत असतील पण ट्रान्सजेंडरविरोधात नाही करत असं मला वाटतं. ट्रान्सजेंडर म्हणजे त्यांची खासगी मालमत्ताच आहे, असं लोक वागतात.”
लोकांची ही मानसिकता बदलण्याची गरज असल्याचं मत गंगाने व्यक्त केलं. किमान एखाद्या व्यक्तीच्या जीवनात जरी माझ्यामुळे बदल घडला तर ती फार मोठी गोष्ट आहे, असं ती म्हणाली.

No comments

Powered by Blogger.