पुण्यातही राष्ट्रवादीचा राडा, ABVPच्या कार्यालयाला फासलं काळं

पुणे, 7 जानेवारी : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (JNU)इथं कॅम्पसमध्ये घुसून विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचे पडसाद सलग दुसऱ्या दिवशीही महाराष्ट्रात उमटत आहेत. राष्ट्रवादी युवकच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातील टिळक रोड येथील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (ABVP) कार्यालयाच्या बोर्डला काळं फासलं आहे. जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीचा निषेध म्हणून राष्ट्रवादीने हे आंदोलन केलं आहे.
जेएनयू विद्यार्थी मारहाणीवरून राष्ट्रवादी काँग्रेस राज्यभरात आक्रमक झाली आहे. काल (सोमवारी) राष्ट्रवादीने मुंबईत भाजपच्या कार्यायाबाहेर आंदोलन केलं होतं. तर दुसरीकेड नाशिकमध्ये (nashik) राष्ट्रवादी युवकचे कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळाले. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (ABVP) कार्यालयावर धडक दिली. यावेळी हे दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले होते.
नाशिकमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ABVP च्या कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी केली होती. तसंच कार्यालयात घुसण्याचा प्रयत्नही केला. त्यानंतर ABVPचे कार्यकर्तेही आक्रमक झाले. त्यामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला. मात्र आक्रमक कार्यकर्त्यांनी यावेळी दगडफेक करण्याचा प्रयत्न केला होता.
JNU हल्ल्याचा देशभर निषेध, महाराष्ट्रातही निदर्शने
राजधानी दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (JNU) रविवारी रात्री पुन्हा एकदा तुफान राडा झाला. त्याचे पडसाद पुण्यासह मुंबईतही पाहायला मिळाले. विद्यार्थी आणि प्राध्यपकांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मशाल हातात घेत एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांची कॅम्पसमध्ये घोषणाबाजी केली. विद्यार्थी संघटनांनी 'नही सेहेंगे नही सेहेंगे दादागिरी नही सहेंगे'च्या जोरदार घोषणा दिल्या आहेत. मुंबईतही विविध विद्यार्थी संघटनांनी जेएनयूमध्ये झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आंदोलन पुकारलं आहे. गेटवे ऑफ इंडियासमोर आणि पवईमध्ये विद्यार्थी आंदोलन करत आहेत.
JNU मध्ये नेमकं काय घडलं?
रविवारी रात्री (JNU)इथं कॅम्पसमध्ये घुसून विद्यार्थ्यांवर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात अनेक विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ABVP वर हल्ल्याचा आरोप
देशातील नामांकित विद्यापीठ अशी ओळख असणाऱ्या JNU मध्ये रविवारी रात्री काही गुंड घुसले. या टोळक्याने तिथल्या विद्यार्थ्यांवर हल्ला केला. या हल्ल्यात अनेक मुलं जखमी झाली. रक्तबंबाळ झालेल्या अनेक मुलांचे फोटोही समोर आले आहेत. विद्यापाठीत झालेला हा हल्ला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (ABVP) कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप डाव्या संघटनांनी केला आहे
Post a Comment