भाजपचे हे खासदार अडचणीत
![]() |
भाजपचे हे खासदार अडचणीत |
सोलापूरचे भाजपचे खासदार तथा गौडगाव वीरशैव मठाचे मठाधिपती डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांचा ‘बेडा जंगम’ नावाचा अनुसूचित जातीचा दाखला संशयास्पद असल्याचे स्पष्ट झाले असून या प्रकरणी सोलापूरच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
सोलापूर लोकसभा राखीव मतदार संघातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर या दोघांचा पराभव करून डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी निवडून आले होते. परंतु लोकसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्या जातीच्या दाखल्याला ‘एमआयएम’चे स्थानिक नेते, माजी उपमहापौर प्रमोद गायकवाड यांनी हरकत घेतली होती. निवडणूक अधिकाऱ्यांनी ती हरकत फेटाळून लावली असता नंतर प्रमोद गायकवाड यांच्यासह मिलिंद मुळे व विनायक कंदकुरे आदींनी जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे तक्रार दाखल करून खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजींचा अनुसूचित जातीचा दाखला अपात्र ठरविण्याची मागणी केली होती. त्यावर सुनावणी सुरू आहे.
दरम्यान, जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या अध्यक्षांच्या सूचनेनुसार तेथील दक्षता समितीने खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्या अनुसूचित जातीच्या दाखल्याच्या सत्यतेची चौकशी केली. या चौकशीत डॉ. शिवाचार्य यांचे पुतणे योगेश्वर सिद्धमल्लय्या हिरेमठ (रा. गौडगाव, ता. अक्कलकोट) यांना मिळालेल्या जातीच्या दाखल्याची चौकशी केली असता त्यांचा जातीचा दाखला ‘हिंदू जंगम’ असा मागासप्रवर्गाचा असल्याचे दिसून आले. या ओबीसी दाखल्याच्या आधारे खासदारांच्या पुतण्याने शासकीय लाभ घेतला आहे. या अनुषंगाने दक्षता समितीने भीमाशंकर महादेव वाघमोडे, हणमंत गुरुलिंगप्पा पाटील, नागप्पा सिद्रामप्पा पाटील, शिवकुमार शिवशंगर ढगे बसण्णा लिंगप्पा माशाळे, धोंडू खुबा राठोड या स्थानिक गावक ऱ्यांनी दक्षता समितीसमोर दिलेले जबाब वस्तुस्थितीला धरून नसल्यामुळे त्या जबाबाबद्दलही खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांना जात प्रमाणपत्र पडताळणी समितीसमोर स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे.
जानेवारी १९८२ मध्ये डॉ. शिवाचार्य यांनी ‘बेडा जंगम’ प्रमाणपत्र मिळविले होते. त्याची दक्षता समितीने चौकशी केली असता जात प्रमाणपत्र नोंदणीसाठी दोन पुस्तिका असल्याचे आढळून आले असून जात प्रमाणपत्र नोंद असलेल्या रजिस्टरमधील नोंदीमध्ये,अक्षरबदल, शिक्का बदल व नोंदी अलीकडच्या काळातील असल्याचे आढळून आल्याचा अभिप्राय दक्षता समितीने दिला आहे.
खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचे बंधू, बहीण, चुलते, आत्या आणि आजोबा किंवा अन्य रक्ताच्या नात्यातील व्यक्ती या देखील ‘बेडा जंगम’ जातीचे असल्याबद्दल जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे पुरावे सादर करण्यात आले नाहीत. त्यामुळे ‘बेडा जंगम’ हे अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र रद्द का करू नये अशी नोटीस समितीने खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांना बजावली आहे.
Post a Comment