केंद्र सरकार फक्त महाराष्ट्रातच हस्तक्षेप का करु पाहत आहे :शिवसेना
केंद्र सरकार फक्त महाराष्ट्रातच हस्तक्षेप का करु पाहत आहे.
![]() |
| केंद्र सरकार फक्त महाराष्ट्रातच हस्तक्षेप का करु पाहत आहे :शिवसेना |
'एनआयए'ने महाराष्ट्रात झडप घातली. भाजपशासित राज्यातही अशी प्रकरणे घडत आहेत. मग केंद्र सरकार फक्त महाराष्ट्रातच हस्तक्षेप का करु पाहत आहे, असा सवाल शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तून विचारण्यात आला आहे.भीमा-कोरेगाव प्रकरणाचा तपास राज्य सरकारकडून काढून राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) सोपविल्याच्या केंद्राच्या निर्णयाविरोधात शिवसेनेने दंड थोपटले आहेत. .
यापूर्वी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसने या मुद्द्यावरून केंद्राला आव्हान दिले होते. मात्र, आता शिवसेनेनेही या लढाईत उडी घेतली आहे. केंद्र सरकारने ज्या तडकाफडकी हा तपास NIA कडे म्हणजे स्वत:च्या अखत्यारित घेतला त्यावरून या सर्व गोष्टींची 'झाकली मूठ' कायम राहावी असाच केंद्र सरकारचा हेतू आहे का?, असा सवाल शिवसेनेने उपस्थित केला.
तसेच शनिवारवाड्यासमोर एल्गार परिषदेत काही बाहेरच्या लोकांनी चिथावणीखोर भाषणे केली. ही भाषणे करणारे लोक भाजपच्या भाषेत तुकडे 'तुकडे गँग'चे सदस्य होते हे मान्य केले तरी या 'तुकडे गँग'पेक्षा भयंकर विखारी भाषणे सध्या भाजपचे नेते, मंत्री करू लागले आहेत. आंदोलन करणाऱ्यांना गोळ्या घाला, देशाबाहेर फेकून द्या, अशी उन्मत्त भाषा मंत्रीपदावरील व्यक्ती करत आहेत. अर्थात हा त्यांचा राष्ट्रभक्तीचा 'एल्गार' ठरतो व त्यामागे एखादे षडयंत्र आहे का, याचा तपास व्हावा असे कुणासही वाटत नाही, असा टोलाही शिवसेनेने भाजपला लगावला.
एल्गारप्रकरणी केंद्रीय गृहमंत्रालयाने रात्रीच 'एनआयए'ला महाराष्ट्रात पाठवले. हे लक्षण बरे नव्हे. रात्रीच्या अंधारात पाय ठेचकाळू नये म्हणून महाराष्ट्र सरकारने मुंबई रात्री उघडी ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे काळोखात पाप करू नका, काय असेल ते उजेडात करा, असा सल्लाही शिवसेनेने भाजपला दिला.

Post a Comment