आता 'ही' कंपनी भारतात कार बनवणार

आता 'ही'  कंपनी भारतात कार बनवणार


भारतीय बाजारपेठेत विस्तार करण्यासाठी 'ग्रेट वॉल मोटर्स'कडून १५०० ते २००० कोटींची गुंतवणूक करण्याची शक्यता आहे. पुण्याजवळील तळेगावमधील जनरल मोटर्स कंपनीचा उत्पादन प्रकल्प आहे. हा प्रकल्प 'ग्रेट वॉल मोटर्स'ने विकत घेतला आहे. यासाठी दोन्ही कंपन्यांमध्ये नुकताच करार झाला आहे. त्यानुसार 'ग्रेट वॉल मोटर्स' या प्रकल्पाच्या खरेदीसाठी ७०० कोटी खर्च करणार आहे. त्याशिवाय या प्रकल्पात 'ग्रेट वॉल मोटर्स'कडून नवीन यंत्रसामुग्री, संशोधन केंद्र आणि वाहननिर्मितीतील आवश्यक यंत्रणा उभारली जाणार आहे. जनरल मोटर्सच्या तळेगाव प्रकल्पाची वार्षिक १६०००० वाहन निर्मितीची क्षमता आहे.
चीनमधील 'SAIC' कंपनीच्या 'एमजी हेक्टर' या कारला भारतीय ग्राहकांनी तुफान प्रतिसाद दिल्यानंतर आणखी एक चिनी वाहन उत्पादक कंपनीला भारतीय बाजारपेठ खुणावू लागली आहे. चीनमधील 'ग्रेट वॉल मोटर्स'ने भारतात मोटार निर्मितीचा निर्णय घेतला असून नुकताच कंपनीने तळेगावमधील जनरल मोटर्सचा उत्पादन प्रकल्प ताब्यात घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली. 
'ग्रेट वॉल मोटर्स' ही 'SUV' प्रकारातील मोटारी बनवणारी जागतिक पातळीवरील आघाडीची चिनी कंपनी आहे. जनरल मोटर्सच्या तळेगावमधील प्रकल्प खरेदीने 'ग्रेट वॉल मोटर्स'चा भारतीय बाजारपेठेतील प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. पुढील महिन्यात दिल्लीतील प्रगती मैदानावर होणाऱ्या 'ऑटो एक्स्पो'मध्ये 'ग्रेट वॉल मोटर्स' आपल्या मोटारी सादर करणार आहे. यात प्रसिद्ध हॅवल ब्रँड आणि इलेक्ट्रिक मोटारींचा समावेश आहे. ''भारतीय अर्थव्यवस्था झपाट्याने वाढत आहे. इथंल्या वाहन बाजारपेठेत प्रचंड संधी आहेत. 'ग्रेट वॉल मोटर्स' साठी भारतीय बाजारपेठ महत्वाची आहे, असे मत 'ग्रेट वॉल मोटर्स'चे उपाध्यक्ष ली झिगंशांग यांनी व्यक्त केले. केंद्र सरकारच्या 'मेक इन इंडिया' आणि 'डिजिटल इंडिया' या महत्वकांक्षी उपक्रमांना 'ग्रेट वॉल मोटर्स' कडून दिलेला हा प्रतिसाद आहे, असे त्यांनी सांगितले.


'जनरल मोटर्स'ने गाशा गुंडाळला
भारतीय बाजारपेठेत आपली छाप पाडण्यात अपयशी ठरलेल्या अमेरिकेतील 'जनरल मोटर्स'ने भारतातून गाशा गुंडाळला आहे. कंपनीने भारतात कार विक्री बंद केली आहे. जनरल मोटर्सची भारतीय उपकंपनी शेवर्ले सेल्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे कामकाज मात्र सुरु राहणार असून जनरल मोटर्सच्या ग्राहकांना विक्रीपश्चात सेवा दिली जाईल, असे जनरल मोटर्सने म्हटलं आहे. जनरल मोटर्सने यापूर्वी गुजरातमधील हलोल येथील प्रकल्प चीनमधील 'एसएआयसी' कंपनीला विक्री केला होता. या प्रकल्पात 'एमजी हेक्टर' या कारचे उत्पादन होते.

No comments

Powered by Blogger.