जामियामध्ये गोळीबार करणाऱ्या तरुणाचा होणार सत्कार

जामियामध्ये गोळीबार करणाऱ्या तरुणाचा होणार सत्कार
जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ परिसरात तैनात असलेल्या पोलिसांसमोरच सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधातील (सीएए) आंदोलकांवर गोळीबार करणाऱ्या तरुणाचा हिंदू महासभेकडून सत्कार केला जाणार आहे. “हा तरुण नथुराम गोडसेप्रमाणे खरा राष्ट्राभक्त आहे,” असंही हिंदू महासभेने म्हटलं आहे. “शरजील इमाम आणि अलीगढ मुस्लिम विद्यापीठ, जवाहरलाल नेहरु विद्यापीठ, शाहीन बागमधील देशद्रोही लोकांना गोळ्या घातल्या पाहिजेत,” असं धक्कादायक वक्तव्य हिंदू महासभेच्या प्रवक्त्यांनी केलं आहे. यासंदर्भातील वृत्त टाइम्स नाऊ या वेबसाईटने दिलं आहे.
“या मुलाचा आम्हाला अभिमान आहे. त्याने जामियाच्या कॅम्पसमधील देशद्रोही कृत्य करणाऱ्या विद्यार्थ्यांना अपेक्षित असणारी आझादी देण्याचा प्रयत्न केला,” असं मत हिंदू महासभेचे प्रवक्ते अशोक पांडे यांनी व्यक्त केलं आहे. देशद्रोही विचारसरणीच्या व्यक्तींना धडा शिकवण्याचा प्रयत्न या तरुणाने केला आहे असंही पांडे म्हणाले. इतकंच नाही तर “खून आणि देशाच्या भल्यासाठी केलेल्या कृत्यामध्ये फरक असतो. देशहितासाठी केलेल्या कृत्याला कायदा वेगळा असतो,” मतही पांडे यांनी मांडले.
जामियामध्ये गोळीबार करणाऱ्या तरुणाचा सत्कार करण्याबरोबरच त्याला या प्रकरणात लागणाला सर्व कायदेशीर खर्च हिंदू महासभा करणार असल्याचेही पांडे यांनी स्पष्ट केलं आहे.

No comments

Powered by Blogger.