नक्की काय घडलं जामियामध्ये?
![]() |
नक्की काय घडलं जामियामध्ये? |
महात्मा गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त जामियाच्या विद्यार्थ्यांनी गुरुवारी राजघाटपर्यंत शांतता मोर्चा काढण्याचे ठरवले होते. सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीविरोधात जामियाच्या विद्यार्थ्यांनी पहिल्यांदा आंदोलन सुरू केले. ते नंतर देशभर पसरले आणि जामियापासून काही अंतरावर असलेला शाहीन बाग हा परिसर आता आंदोलनाचा केंद्रबिंदू बनला आहे. जामिया येथेही आंदोलन कायम असून मोर्चा काढण्यासाठी गुरुवारी दुपारी हजारो विद्यार्थी जमले होते. त्यामुळे या परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. आंदोलकांमध्ये उभ्या असलेल्या एका तरुणाने खिशामधून बंदूक काढली आणि आंदोलकांवर गोळीबार केला. पोलीसच नव्हे तर शीघ्र कृती दलाचा ताफाही तैनात असताना हिंसाचाराची घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या घटनेनंतर आंदोलन आणखी तीव्र झाले. जवळपास सात तासांनंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी जेमतेम आठवडाभराचा कालावधी उरला असताना भाजपने नागरिकत्व दुरुस्ती विरोधातील शाहीन बागमधील आंदोलनाभोवती प्रचार केंद्रित केला आहे. या आंदोलनाविरोधात भाजपच्या नेत्यांनी प्रक्षोभक भाषणे केली आहेत. केंद्रीय राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी प्रक्षोभक विधान केल्यानंतर दोन दिवसांनी जामिया परिसरात युवकाने गोळीबार केला. त्यामुळे दिल्ली निवडणूक प्रचार अधिक गंभीर बनला आहे.
Post a Comment