उद्धव कोणत्याच ठाकरेंसारखे दिसत नाहीत :निलेश राणे
![]() |
उद्धव कोणत्याच ठाकरेंसारखे दिसत नाहीत |
“आज के शिवाजी नरेंद्र मोदी” या पुस्तकावरुन सुरु झालेला वाद आता थेट शिवाजी महाराजांच्या वंशजांपर्यंत पोहचला आहे. बुधवारी पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमामध्ये शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी “उदयनराजेंनी शिवरायांचे वंशज असल्याचे पुरावे आणावेत,” असा टोला लगावला. मात्र आता यावरुनच भाजपाचे नेते निलेश राणे यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. “उद्धव ठाकरे कोणत्याच ठाकरेंसारखे दिसत नाही तरी आम्ही कधी काही बोललो नाही,” असा टोला राणेंनी ट्विटवरुन लागावला आहे.
‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरुन राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. भाजप नेते जय भगवान गोयल यांच्या ‘आज के शिवाजी : नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरून राज्यात मोठा गदारोळ सुरू आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी या प्रकरणी छत्रपतींच्या वंशजांनी बोलावे, अशी मागणी केली होती. त्यावर साताऱ्याचे माजी खासदार, भाजप नेते उदयनराजे भोसले यांनी मंगळवारी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली.
उदयनराजेंची शिवसेनेवर टीका
पत्रकार परिषदेमध्ये उदयनराजेंनी शिवसेनेवर टीका केली. “शिवसेना नाव दिलं तेव्हा वंशजांना विचारलं होतं का?,” असा सवाल यावेळी उदयनराजे यांनी विचारला. “शिवाजी महाराजांच्या सोयीप्रमाणे वापर करायचा आणि सोयीप्रमाणे विसर पडणे हीच यांची लायकी आहे,” अशा शब्काय दांत उदयनराजे यांनी शिवसेनेवर टीका केली होती.
राऊत काय म्हणाले
उदयनराजेंच्या या टीकेला उत्तर देताना संजय राऊत यांनी उदयनराजेंकडे शिवरायांचे वंशज असल्याचे पुरावे देण्याची मागणी केली. “उदयनराजे काय बोलतात हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांना बोलण्याचा अधिकार आहे. ते भाजपाचे माजी खासदार आहेत. ते विरोधी पक्षाची भूमिका मांडतात. त्यांनी आपण शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे आणावेत. गणपती, विष्णूची पूजा करताना वंशज असावं लागत नाही,” असं संजय राऊत यांनी सांगितलं. “आम्ही सातारा, कोल्हापूरमधील गादीचा आदर करतो. महाराजांचं नाव जिथे येतं तिथे आम्ही नतमस्तक होतो. शिवाजी महाराजांच्या नावाने बाळासाहेबांनी एकजुटीचं काम पुढे नेलं,” असं राऊत म्हणाले.
निलेश राणेंची टीका
राऊत यांनी केलेल्या मागणीवरुन निलेश राणेंनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडताना उदयनराजेंना पुरावा देण्याची काही गरज नसल्याचे म्हटलं आहे. “आदरणीय उदयनराजेंनी पुरावे द्यायची काही गरज नाही, आम्हाला कळत नाही उद्धव ठाकरे तर कुठल्याच ठाकरेंसारखे दिसत नाही पण आम्ही कधीही बोललो नाही की त्यांना रस्त्यावरून आणले काय?,” असं ट्विट निलेश यांनी केलं आहे.
भाजप भूमिका ?
“शिवसेनेला आता छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा नैतिक अधिकार उरला नसून या अपमानाबद्दल शिवसेनेने माफी मागितली पाहिजे. विश्वासघाताने सत्तेवर आल्यामुळे शिवसेना नेत्यांच्या डोक्यात मस्ती गेली आहे. संजय राऊत यांच्या आजच्या विधानावरून हेच दिसत आहे. शिवसेना राऊतांच्या या उद्दाम सवालाशी सहमत आहे का? हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले पाहिजे. उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्यावर कारवाई केली तरच त्यांच्या भूमिकेबद्दल लोकांची खात्री पटेल,” अशी प्रतिक्रिया भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी दिली.
Post a Comment