साईबाबा पैठणच्या धुपखेड्यामध्ये प्रकटले
![]() |
साईबाबा पैठणच्या धुपखेड्यामध्ये प्रकटले |
साईबाबा जन्मस्थळाचा वाद पेटला असतानाच आता आता साईबाबांचे आणखी एक प्रकट ठिकाण समोर येत आहे. साईबाबा पैठण तालुक्यातील धुपखेडा येथेच प्रकट झाले. येथूनच ते शिर्डीला गेल्याचा दावा धुपखेडा येथील साईबाबा संस्थानचे अध्यक्ष पांडूरंग वाघचौरे यांनी केला आहे. त्यामुळे साईबाबांच्या जन्मस्थळाच्या वादात आणखीच भर पडली आहे.
साईबाबांच्या जन्मस्थळाविषयी माहिती देताना धुपखेडा येथील संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग वाघचौरे यांनी सांगितले की, साईबाबा हे धुपखेडा येथे प्रगट झाले होते. त्यांनी येथील लिंबाच्या झाडाखाली अनेक दिवस मुक्काम केला व ते येथील पोलिस पाटील चांदभाई पटेल यांच्याकडे काही काळ राहिले. चांदभाई पटेल यांच्या भाच्याच्या लग्नाच्या वरातीत ते शिर्डी येथे गेले होते. धुपखेड्याला असा इतिहास असताना या प्रकटभूमीकडे शासनाने लक्ष दिले नाही, असे ग्रामस्थांनी या वेळी सांगितले. विशेष म्हणजे तसा ठराव सोमवारी ग्रामस्थांनी घेतला आणि हीच साईबाबांची प्रकटभूमी असल्याचे सांगितले. साईबाबांच्या सच्चरित्राच्या पाचव्या आवृत्तीत पैठणच्या धुपखेड्याचा उल्लेख आहे. साई संस्थाने हे साईचरित्र प्रकाशित केले असून त्याच्या पाचव्या आवृत्तीमध्ये पैठणच्या धुपखेड्याचाही उल्लेख आहे. दरम्यान, हा वाददेखील आणखी वाढण्याची शक्यता आहे.
लिंबाचा पाला गोड लागतो
धुपखेडा येथील साईबाबा मंदिराच्या लगत लिंबाचे झाड असून या ठिकाणी साईबाबा यांनी ध्यान केले होते. आजही या लिंबाचा पाला गोड लागतो, असा दावाही पांडुरंग वाघचौरे यांनी केला आहे.
प्रकटभूमीच वंचित
साईबाबा हे धुपखेडा येथे प्रगट झाले होते. ते येथूनच शिर्डीला गेले. मात्र ही भूमी विकासापासून वंचित आहे. आम्ही ग्रामस्थांचा ठराव घेऊन मुख्यमंत्र्यांना देणार आहोत. संजय वाघचौरे, माजी आमदार.
Post a Comment