तुकाराम मुंढेंच्या हाती नागपूरची कमान, तर अश्विनी भिड़ेंची प्रधान सचिवपदी बढती

तुकाराम मुंढेंच्या हाती नागपूरची कमान, तर अश्विनी भिड़ेंची प्रधान सचिवपदी बढती
नाशिकचे महापौर आणि पीएमपीएलचे आयुक्त म्हणून कारकीर्द गाजवल्यानंतर आता तुकाराम मुंढेंची नागपूर महापालिकेचे आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर मुंबई मेट्रो प्राधिकरणाच्या व्यवस्थापकीय संचालकपदावरुन अश्विनी भिडे यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी रणजीतसिंह देओल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळं अश्विनी भिडेंच्या खांद्यावर कोणती जबाबदारी सोपवण्यात येते याची जोरदार चर्चा सुरु आहे. राज्य सरकारने 22 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. या अधिकाऱ्यांमध्ये तुकाराम मुंढे आणि अश्विनी भिडे यांच्या नावाचाही समावेश आहे. राज्य सरकारने त्यांची नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदी बदली केली आहे. तुकाराम मुंढे हे शिस्तप्रिय, कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जातात. ते एड्स नियंत्रण प्रकल्पाच्या संचालकपदावर होते. तत्कालीन फडणवीस सरकारने त्यांची एड्स नियंत्रण प्रकल्पाच्या संचालकपदावर नियुक्ती केली होती.
ज्या शहरात तुकाराम मुंढे आयुक्त म्हणून किंवा प्रशासकिय अधिकारी म्हणून गेले, तिथं त्यांना स्थानिक नगरसेवक आणि लोकप्रतिनिधींच्या विरोधाचा सामना करावा लागला आहे. नागपूर हे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं होमग्राऊंड आहे. त्यामुळं तुकाराम मुंढेंच्या बदलीमागे हे कनेक्शन आहे का? असा सवाल आता चर्चिला जात आहे.

मुख्य सचिव कार्यालयाचे सहसचिव राजीव निवतकर यांची मुंबई शहर जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय प्रशासन सेवेतील 2010 च्या तुकडीचे असलेले निवतकर यांनी विविध प्रशासकीय पदांवर काम केले आहे. 1994 मध्ये त्यांची उपजिल्हाधिकारी म्हणून निवड करण्यात आली होती.
अश्विनी भिडे यांना आता प्रधान सचिवपदी बढती देण्यात आली आहे. आरे वसाहतीमधील मेट्रो-3 च्या कारशेडच्या मुद्द्यावरुन अश्विनी भिडे आणि शिवसेनेमध्ये तीव्र मतभेद झाले होते. मात्र, हे मतभेद बाजूला ठेवत ठाकरे सरकारकडून अश्विनी भिडे यांना पदोन्नती देण्यात आली आहे. मेट्रो कारशेडसाठी मुंबईतील आरे वसाहतीमधील वृक्षतोडीवरुन वाद झाल्यानंतर मेट्रो-3 च्या संचालक असलेल्या अश्विनी भिडे यांच्यावर शिवसेनेने टीका केली होती. यावेळी आरे येथील कारशेड प्रकल्प हलवल्यास प्रकल्पच होणार नसल्याची भूमिका भिडे यांनी घेतली होती. त्यावेळी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी अश्विनी भिडेंवर टीकादेखील केली होती. अश्विनी भिडे यांना हटवून सक्षम अधिकाऱ्याला जबाबदारी द्यावी, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. परंतु ही मागणी पूर्ण झाली नव्हती. मात्र, आता शिवसेनेची राज्यात सत्ता येऊन उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आहेत, तर आदित्य ठाकरेदेखील कॅबिनेट मंत्री आहेत. त्यामुळे ठाकरे सरकार भिडेंची बदली करेल, असा अंदाज अनेक जण वर्तवत होते

No comments

Powered by Blogger.